esakal | विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसविणाऱ्या संगणक अभियंत्यास अटक | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

crime

विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसविणाऱ्या संगणक अभियंत्यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शुक्रवारी सकाळी 8.30 वाजताची वेळ. लोहगाव विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली. त्याचवेळी आरडाओरडा करणाऱ्या एका संगणक अभियंता प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. पोलिस, बॉम्बशोधक पथकांसह अन्य सुरक्षा यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाची कसून तपासणी केली, मात्र त्यामध्ये बॉम्ब आढळला नाही, अखेर पोलिसांनी त्यास अटक केली.

ऋषिकेश सावंत (वय 28, रा.बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा आयटी कंपनीत नोकरीला आहे. सावंत याच्या पत्नीला रांची येथे जायचे असल्याने शुक्रवारी साकाळी साडे आठ वाजता तो पत्नीला सोडविण्यासाठी विमानतळावर आला होता. 16 ऑक्‍टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकीट होते. मात्र 16 ऑक्‍टोबरपासून विमानतळ बंद आहे. त्यामुळे सावंत हा तेथील कर्मचाऱ्यांना विमानाचे परतीचे तिकीट 16 तारखेला अधिकृत करून द्या, असे सांगत होता. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने "रांचीला निघालेल्या विमानात बॉम्ब आहे' असे ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे विमानतळावर चांगलीच खळबळ उडाली.

विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने विमानतळ पोलिस सतर्क झाले. याबरोबरच बॉम्ब शोधक व नाशक पथके, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने तेथे पोचल्या. सावंतने सांगितलेले विमान बाजूला घेण्यात आले, विमानाची तीन तास कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी सावंतने विमानातील महिला कर्चमाऱ्याशीही अश्‍लिल वर्तन केले. दरम्यान, हि अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

हेही वाचा: Pune Crime : महिलेशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एकास अटक

""शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास विमानतळावर असलेल्या एका प्रवाशाने विमानामध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस यंत्रणेने तत्काळ सतर्क झाली. त्याने सांगितलेल्या विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीही आढळले नाही. त्याने अफवा पसरविल्याने त्याच्यावर कारवाई केली.''

पंकज देशमुख,

पोलिस उपायुक्त, परिमंडळ 4.

विमानात बॉम्ब ठेवल्याचे पडते स्वप्न !

""माझ्या स्वप्नात रोज रात्री विमानात बॉम्ब ठेवल्याचे मला दिसते. तुम्हाला पुढील पंधरा दिवस मोठा धोका आहे' असे सांगत सावंतने विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सावंत यास अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यास मानसिक आजार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्यामुळे रांचीला निघालेल्या विमानास तीन तास उशीर झाला.

loading image
go to top