Aadhaar update : आधार अपडेट होत नसल्याने शाळा महाविद्यालये गॅसवर.... Aadhaar update Schools and colleges the gas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aadhaar card

Aadhaar update : आधार अपडेट होत नसल्याने शाळा महाविद्यालये गॅसवर....

बारामती : विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीत वैध ठरण्यासाठी शाळांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र तरीही सर्व्हर संथ गतीने चालत असल्याने हे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने शाळा प्रशासनाचे टेंशन वाढले आहे.

शिक्षण उपसंचालक पुणे विभागीय कार्यालयामार्फत पुणे जिल्हातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटपडताळणी व संचमान्यता शिबिर पुणे येथे या आठवड्यात आयोजित केले आहे. या शिबिरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल प्रणालीमध्ये वैध ठरले तरच शाळांना संचमान्यता दिली जाईल, असे संबंधित अधिका-यांनी फर्मान काढले आहे.

प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मागील महिन्याभरापासून अहोरात्र झटत असून प्रवेशित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून ते सरल प्रणालीवर वैध करण्याचे काम करत आहेत. शासनाने जी वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे त्या सरल वेबसाईटचा सर्व्हर अत्यंत संथ गतीने चालत असल्याने हे काम होताना अनंत अडचणींना शाळा व्यवस्थापनास सामोरे जावे लागत आहे.

एका शाळेच्या एकाच व्यक्तीला हे काम करावे लागत आहे. ही एक खिडकी योजना म्हणजे नाक दाबून तोंड उघडल्याप्रमाणे असल्याची शाळा व्यवस्थापनाची भावना आहे.

एका दिवसात (24 तास) संगणकावर बसून पंधरा ते वीस विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार अपडेट होत नाही, असा अनेक शाळांचा अनुभव आहे. त्यामुळे ज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्याकडे विविध वर्गाच्या दोन ते तीन तुकड्यांपेक्षा जास्त तुकड्या अनुदानित आहेत, त्यांच्यापुढे पट पडताळणी व संच मान्यतेचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे.

हे काम वेळेत झाले नाही आणि अनुदान मिळाले नाही तर त्याची जबाबदारी मुख्याध्यापक व प्राचार्यांवर असेल अशी तंबी देण्यासही प्रशासन यात विसरलेले नाही, त्या मुळे सर्व्हरच काम करत नसेल तर वेळेत आधार अपडेट कसे करायचे हा यक्षप्रश्न शाळा महाविद्यालयांपुढे आहे.

हा गंभीर प्रश्न शिक्षण उपसंचालकांनी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुणे जिल्हा परिषद यांनी समजून घेऊन प्रथम तो सोडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बहुतेक शाळांमधील मुख्याध्यापक, संस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांनी केले आहे.