Pune : आला रे आलाऽऽ... नवऱ्यांसाठी नवा आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

आला रे आलाऽऽ... नवऱ्यांसाठी नवा आजार

सकाळचा नाश्ता झाल्यानंतर विराज निवांतपणे पेपर वाचत असल्याचे पाहून स्वरालीला ते अजिबात आवडलं नाही. वास्तविक ही वेळ काहीतरी खुसपट काढून भांडायची होती. पाच-दहा मिनिटे नवऱ्याशी भांडलं, की तिचा दिवस छान जायचा. दिवसभर उत्साह वाटायचा. पण आज पेपरमध्ये डोकं खुपसून विराजने तिची निराशा केली होती. ‘‘अहो, मी काय म्हणते.’’ स्वरालीने पॉझ घेत अंदाज घेतला. ‘‘तुझं बरोबर आहे. शंभर टक्के बरोबर आहे. मी सहमत आहे तुझ्याशी.’’ विराजने म्हणाला. ‘‘अहो मी अजून काहीच बोलले नाही...’’ स्वराली म्हणाली. त्यावर विराज म्हणाला, ‘‘म्हणून काय झालं? तरीही तूच बरोबर आहेस. माझंच चुकलं. त्याबद्दल सॉरी.’’ विराजने कान पकडत म्हटलं. ‘‘तुम्हाला कितीवेळा सांगितलं असेल. नाश्ता झाल्यानंतर ‘सॉरी’ म्हणायचं नाही म्हणून. माझा भांडणाचा सगळा मूडच जातो.’’ स्वराली रागात म्हणाली. ‘‘अगं ‘खारी’ खायची असेल तर खा ना. मला काय विचारतेस?" विराजने म्हटले.

‘‘अहो मी ‘सॉरी’विषयी बोलतेय. तुम्ही मध्येच ‘खारी’ कोठून आणली. बहिरे झालाय काय?’’ स्वरालीने विचारले. ‘‘घेऊ घेऊ. हिरे आणि सोन्याचेही दागिने नक्की घेऊ.’’ विराजने म्हटले.

‘‘अहो, तुम्हाला खरंच ऐकू येत नाही का? नाटक करताय?’’ स्वरालीने विचारले. ‘‘मध्येच फाटकाचं काय काढलंस. कधीतरी मुद्याला धरून बोल की.’’ विराजने असं म्हटल्यावर स्वरालीचा संशय वाढला. मग तिने एका कागदावर ‘‘तुम्हाला ऐकू येत नाही. डॉक्टरांकडून कान तपासून या.’’ असं लिहलं. ते पाहून विराजही काळजीत पडला. तो तातडीने डॉक्टरांकडे निघाला. सोसायटीच्या गेटवर नेवसे भेटले. ‘काय विराज बरं चाललंय ना’ असं त्यांनी विचारल. विराजला त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू आलं. दोघांनीही दहा मिनिटे गप्पा मारल्या. थोडं पुढं गेल्यावर गाड्यांचा आवाज, रस्त्यातील भांडणेही त्याला नीट ऐकू आली. उलट पंधरा मिनिटे तो भांडणे बघत बसला.

‘‘अरे बाप रे! आपल्याला तर सगळं ऐकू येतंय. मग फक्त स्वरालीचे बोलणं ऐकू येत नाही काय?’’ अशी शंका आली. तसं त्याने डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरांचंही बोलणंही त्याला नीट ऐकू येत होतं.

‘‘खरंच तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला ‘वाईफडिफ’ हा दुर्मिळ आजार झालाय. यामध्ये फक्त बायकोचं बोलणं ऐकू येत नाही. तुमची बायको आता तुमच्याशी कधीच भांडू शकणार नाही. तुम्हाला सुखी राहण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही.’’ डॉक्टरांनी असं सांगितल्यावर विराजची कळी खुलली. तो खुशीतच घरी आला व स्वरालीला त्यानं सगळं सांगितलं. हे ऐकताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने एका कागदावर परत लिहून त्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठवले. विराजही नाइलाजाने परत डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांनी इंजेक्शन व काही औषधे दिली. त्यातील काही औषधे त्याने तिथेच घेतली.

‘‘तुम्हाला तासाभरात बायकोचंही बोलणं ऐकू येईल.’’ डॉक्टरांनी म्हटलं. त्यानंतर नाराजीतच विराज घरी निघाला. रस्त्यात भेटलेला मित्र, सोसायटीचा वॉचमन व खेळणाऱ्या मुलांशीही तो बोलला. त्यानंतर तो घरी आला. ‘‘काय म्हणाले डॉक्टर? माझं बोलणं ऐकू येतंय का?’’ स्वरालीनं विचारलं.

‘‘म्हणजे काय? स्पष्टपणे ऐकू येतंय. पण तू कोठे लपून बसली आहेस? समोर ये.’’ विराजनं म्हटलं.

‘‘अहो मी तुमच्या समोरच आहे.’’ स्वरालीने म्हटलं.

‘‘काय तरीच काय? मला फक्त तुझा आवाज ऐकू येतोय. तू दिसत नाहीस.’’ विराजने म्हटले.

‘‘क्काऽऽय तुम्हाला मी दिसत नाही. बाप रे!’’ स्वराली जोरात किंचाळली.

सु. ल. खुटवड

(९८८१०९९०९०)

loading image
go to top