आंबेगावात डागडुजीचे काम संथ गतीने

आंबेगाव बुद्रुक - गावठाण मुख्य चौकात महापालिकेचे चालू असलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम.
आंबेगाव बुद्रुक - गावठाण मुख्य चौकात महापालिकेचे चालू असलेले सांडपाणी वाहिनी दुरुस्तीचे काम.

पुणे - मुसळधार पावसामुळे आंबेगावात पूरस्थिती निर्माण होऊन परिसराचे मोठे नुकसान झाले होते; मात्र पुरानंतर भागात महापालिकेकडून डागडुजीचे काम संथ गतीने चालू असल्याच्या तक्रारींचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. आमचे प्रामाणिक प्रयत्न चालू असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

आंबेगावातील रस्ते, ओढ्यालगतचा भाग, पूल, स्मशानभूमी आदींची पुरामुळे मोठी हानी झाली. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. दशक्रिया घाटाची पडझड होऊन सीमाभिंती ढासळल्या आहेत. 

ओढ्याने रौद्ररूप धारण केल्याने गायमुखाशेजारील देवीच्या मंदिराकडे जाणारा पुलाचा भाग कोसळला, तर स्मशानभूमीमागील ओढ्यालगत रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे.

महापालिकेत नवीन समाविष्ट आंबेगाव खुर्द व बुद्रुक गावात पावसाळी पाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याने मागच्या पर्जन्यवृष्टीत सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये गाळ व दगडी अडकून सांडपाणी रस्त्यावर उतरले. जोराचा पाऊस व नागरिकांनी वाहिन्यांमध्ये सांडपाणी सोडताना योग्य ती दक्षता न घेतल्यामुळे त्या तुंबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

हवामान बदलामुळे कामावर मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव खुर्द, शनिनगर, दत्तनगर चौक, दळवीनगर येथील वाहिन्या साफ केल्या; पण आंबेगाव बुद्रुक गावठाणातील मुख्य चौकात अद्याप दुरुस्तीचे काम अद्याप चालूच आहे. सांडपाणी उघड्यावरून वाहत आहे. चौकात विविध विक्रेते बसत असल्याने व सतत नागरिकांची वर्दळ चालू असल्याने रस्त्यावरील सांडपाण्याचा व दुर्गंधीचा सर्वांना त्रास होतो. शिवाय वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे ही कामे जलद गतीने व्हावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. गावठाणातील वर्दळीच्या मुख्य चौकात सांडपाणी वाहत असून दुरुस्तीचे काम मात्र संथ गतीने चालू आहे. याने वाहतूक कोंडी व गावच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पुरानंतरची कामे लवकर व्हावी, यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन देणार आहोत.
- संतोष ताठे, नागरिक, आंबेगाव बुद्रुक

पुरामध्ये गावात पहिल्यांदाच ओढ्याकाठच्या परिसराची मोठी हानी झाली. घटनेला दहा बारा दिवस लोटूनही महापालिकेकडून दुरुस्ती व साफसफाईची कामे हव्या त्या गतीने होत नाहीत. त्यामुळे
नागरिक आणि वाहतुकीला त्याचा त्रास होतो. अजून किती दिवस ही कामे चालणार आहेत.
- नवनाथ बेलदरे, नागरिक, आंबेगाव

गावठाणात गाळामुळे बंद झाल्याने वाहिनी नव्याने टाकावी लागणार आहे. हे काम आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. आमचे प्रयत्न चालू असून ग्रामपंचायत काळातील वाहिन्या अपुऱ्या असल्यामुळे पाणी व ड्रेनेजचे तांत्रिकदृष्ट्या नव्याने सक्षम जाळे केल्यानंतरच रस्त्यांची नवी कामे होणार आहे. 
- विजय वाघमोडे, अभियंता, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com