आंबेमोहोर तांदूळ खातोय भाव !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुण्यात सुगंधी आंबेमोहोर तांदळाला खूप पसंती आहे. अनेक वर्षांपासून आंबेमोहोर तांदळाचा खप वाढत चालला आहे. सध्या पुण्यात रोज १० ते १५ टन इतका आंबेमोहोर विकला जातो. म्हणजेच महिन्याला २५० ते ३०० टन या तांदळाचा खप आहे. मात्र, मागील दीड दोन महिन्यांत झालेल्या मोठ्या भाववाढीमुळे आंबेमोहोर तांदळाचा खप कमी झाला आहे.
- राजेश शहा, विक्रेते

मार्केट यार्ड - यंदा आंबेमोहोर तांदळाची सुमारे २५०० रुपये प्रतिक्विंटलने भाववाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात प्रतिक्विंटलचे भाव पहिल्यांदाच ७५०० रुपयांवर पोचले आहेत. किरकोळ बाजारातही किलोचा भाव ८० रुपयांवर पोचला आहे. 

आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक सुरू होते. डिसेंबरमध्ये आंबेमोहोरचे भाव ५००० रुपये प्रतिक्विंटल होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी मध्य प्रदेशातून ८० टक्के, तर २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेशातून येतो. 

यंदा शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आंबेमोहोरचे उत्पादन कमी करून, कोलम तांदळाचे उत्पादन जास्त घेतले. यंदा सुरवातीला लचकारी कोलम तांदळाचे भाव ४२०० ते ४३०० पर्यंत तर आंबेमोहोरचे भाव ४८०० ते ५००० रुपये क्विंटलला मिळाले होते. आंबेमोहोर तांदळाला जास्त उत्पादन खर्च येतो. तसेच उत्पादन मिळण्यासही अधिकचा वेळ लागतो. दोन्ही तांदळाच्या भावात फार मोठी तफावत नसते. त्यामुळे कोलम तांदळाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  

युरोप व अमेरिकेत सुगंधी आंबेमोहोरची निर्यात होत होती. त्यात यंदा सौदी अरब व बांगलादेश या राष्ट्रांकडून आंबेमोहोर तांदळाला मागणी राहिली. परदेशातून याला जास्त मागणी राहिल्याने यंदा विक्रमी भाववाढ झाली असल्याची माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aambemohor rice rate increase