भामा आसखेडच्या जॅकवेलचे काम प्रगतिपथावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

आंबेठाण - भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, जलवाहिनीचे काम खेड तालुक्‍यातील नागरिकांच्या विरोधामुळे बंद आहे. 

आंबेठाण - भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेलचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, जलवाहिनीचे काम खेड तालुक्‍यातील नागरिकांच्या विरोधामुळे बंद आहे. 

जलवाहिनी आणि जॅकवेलच्या कामाला प्रकल्पग्रस्त नागरिकांचा तीव्र विरोध होता. परंतु, जिल्हाधिकारी सौरव राव यांनी करंजविहिरे येथे प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांशी थेट चर्चा केल्याने त्यांचा विरोध बऱ्यापैकी मावळला. या वेळी एक फेब्रुवारीनंतर १६/२ च्या नोटीस दिल्या जातील, असे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर जॅकवेलचे काम वेगात सुरू आहे. परंतु, जलवाहिनीचे काम आसखेड फाटा (ता. खेड) येथे नागरिकांनी बंद पाडले. 

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराचा काही भाग आणि आळंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणाच्या जलाशयातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. जॅकवेलसाठी ३३ मीटर खोल खोदाई करण्यात आली आहे. त्यापैकी २५ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. ८ मीटरचे काम बाकी आहे. तसेच बोगद्याचे १३० पैकी ३० मीटर काम बाकी आहे. ते सध्या बंद आहे.  

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर १० जानेवारीला आसखेड फाटा येथील पंपाजवळ जलवाहिनीचे काम सुरू केले होते. परंतु, काहींनी हे काम बंद पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा वारंवार काम बंद पाडले जात आहे. त्यामुळे मशीनवाले निघून जात आहेत. सहा किलोमीटरचे काम बाकी आहे, असे सतीश झा यांनी सांगितले.

Web Title: aambethan news bhama aaskhed jackwell work