"राष्ट्रवादा'पुढे राष्ट्रकारणाला महत्त्व नाही 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - ""छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकर्म, राष्ट्रकारण केले; पण आज त्यांचेच नाव घेणारे मात्र "राष्ट्रवादा'त दंग आहेत. महाराजांची शिकवण तर सोडाच; परंतु आज "राष्ट्रवादा'पुढे राष्ट्रकारणाला महत्त्व दिले जात नाही,'' अशी खंत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केली. 

पुणे - ""छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर राष्ट्रकर्म, राष्ट्रकारण केले; पण आज त्यांचेच नाव घेणारे मात्र "राष्ट्रवादा'त दंग आहेत. महाराजांची शिकवण तर सोडाच; परंतु आज "राष्ट्रवादा'पुढे राष्ट्रकारणाला महत्त्व दिले जात नाही,'' अशी खंत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केली. 

श्री आदिशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित "आऊसाहेब पुरस्कार' आणि शिवदास निनाद पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उद्योजक अरुण फिरोदिया, फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात शांता नवलखा, लक्ष्मी साळुंके, यमुना बोत्रे, जना आसबे, शांता वाके, तारा कांबळे यांना "आऊसाहेब पुरस्कारा'ने गौरवण्यात आले, तर दादरमधील इतिहासाचे अभ्यासक अप्पासाहेब परब यांना "शिवदास निनाद पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. 

परांजपे म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर राष्ट्रकारण पूर्णपणे थांबले आहे. आज राष्ट्रवाद चर्चिला जातो; मात्र राष्ट्रकारणाबद्दल कोणीच बोलत नाही. सर्जनशीलता, रसिकता आणि सभ्यता हे राष्ट्रकर्माचे किंवा राष्ट्रकारणाचे तीन स्तंभ असून, त्याची बेरीज म्हणजे खरा "राष्ट्रधर्म' आहे. त्यामुळे "राष्ट्रकारण' करण्याची वृत्ती जागृत ठेवणे आवश्‍यक आहे.'' 

पुरस्काराला उत्तर देताना परब म्हणाले, ""आपण शाळेत इतिहास शिकतो तो गुण मिळविण्यासाठी, तर बाह्य जीवनात इतिहासाकडे मनोरंजन म्हणून पाहिले जाते; परंतु हाच इतिहास मनात रुजला, तर त्यातून माणूस घडतो. जीवनात इतिहासाला भूगोलाची जोड दिलेली असते; परंतु आता इतिहासाला विज्ञानाची जोड देण्याची गरज आहे.'' या कार्यक्रमात फिरोदिया आणि जगताप यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता पवार यांनी, तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. 

गड-किल्ल्यांचे संवर्धन हेच खरे "स्मारक' 
""अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. त्याऐवजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहे,'' असे मत इतिहासाचे अभ्यासक अप्पासाहेब परब यांनी व्यक्त केले.

Web Title: aausaheb award