अपहरण झालेल्या डॉ. संजय राऊत यांची सुटका, तिघांना अटक

मिलिंद संगई
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

बारामती - पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फलटण येथील डॉक्टर संजय राऊत यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथक यांनी संयुक्त कारवाई करून डॉक्टर राऊत यांची आज पहाटे काटेवाडीनजिक सुटका केली. 

फलटण येथील संजय राऊत यांना काल रात्री दहाच्या सुमारास अज्ञात आरोपींनी पाच कोटी रुपये खंडणीसाठी रामनगर येथून पळवून नेले होते. या डॉक्टरांना त्यांनी नंतर बारामती परिसरात आणले. या आरोपींकडून पाच कोटी रुपये खंडणीची फोनवरुन सातत्याने मागणी करण्यात येत होती.

या घटनेनंतर सातारा पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस दलाने संयुक्तपणे कारवाई करून काटेवाडी नजीक या आरोपींना जेरबंद केले. सुरुवातीला बारामती शहरात महालक्ष्मी शोरूम जवळ हे पैसे घेण्यासाठी त्यांना बोलावले होते, त्यानंतर ठिकाण बदलून परत काटेवाडी जवळ त्यांना बोलावण्यात आले.

पहाटे काटेवाडी नजीक सातारा व पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईदरम्यान  दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी निकम, सुरेंद्र वाघ, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, दशरथ कोळेकर, स्वप्निल जावळे, गणेश काटकर, अमर थोरात यांनी या कारवाईत भाग घेतला.

Web Title: abducted Dr Sanjay Raut rescued, three arrested