रबाब आत्म्याला सुखावणारे वाद्य - अब्दुल हमीद भट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

रबाबवादकांचा आज गौरव 
अब्दुल हमीद भट यांच्यासह सहा रबाबवादकांना सरहदतर्फे शुक्रवारी (ता. ७) ‘भाई मर्दाना राष्ट्रीय’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नवी पेठेतील श्रमिक पत्रकार भवन येथे सायंकाळी सव्वासहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कलाकारांचे रबाबवादनही या वेळी होणार आहे.

पुणे - ‘रबाब म्हणजे आत्म्याला सुखावणारे, आनंदाची परमोच्च अनुभूती देणारे वाद्य आहे. या वाद्यातूनच ‘सरोद’चा उद्‌भव झाला. मात्र, रबाबला लोकाश्रय कमीच मिळाला. भारतात काश्‍मीरपुरते हे वाद्य मर्यादित राहिले. आता या वाद्याचा लौकिक वाढविण्यासाठी आम्ही देश-परदेशांत जाऊन प्रयत्न करीत आहोत,’’ अशी भावना जम्मू-काश्‍मीरमधील रबाबवादक अब्दुल हमीद भट यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रबाबचा उगम अफगाणिस्तानमधील सांगितला जात असला, तरी पंजाब आणि काश्‍मीरमध्ये या वाद्याचा वापर अनेक वर्षांपासून आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांचे पहिले शिष्य भाई मर्दाना हे नानकदेवांच्या रचनांना रबाबद्वारे साथसंगत करीत असत. काश्‍मीरचे लोकवाद्य म्हणूनही याची ओळख आहे. उस्ताद सनाउल्ला खाँ यांनी या वाद्याला विशेष लौकिक मिळवून दिला.

पेरूचा भाव कमी न केल्याने विक्रेत्यावर चाकूने वार

सनाउल्ला खाँ यांची चौथी पिढी या वाद्याचा झंकार आणि गोडवा जतन करीत आहे. अब्दुल हमीद भट, यावर भट, इश्‍फाक भट यांच्यांसह सनाउल्ला खाँ यांच्या घराण्यातील सहा जण त्यांची वादनशैली पुढे घेऊन जाते आहेत. अब्दुल हमीद भट म्हणाले, ‘‘रबाबच्या आवाजात गोडवा आणि मन:शांती आहे. काश्‍मीरच्या लोकगीतांसाठी याच वाद्याचा वापर केला जातो. 

असंख्य चित्रपटांमध्ये या वाद्याचा वापर झाला आहे.’’ माझ्या आजोबांनी रबाबच्या माध्यमातून काश्‍मिरी लोकगीते जिवंत केली. या वाद्याचा लौकिक वाढविला. परंतु, सरकारने अखेरपर्यंत त्यांचा यथोचित गौरव केला नसल्याची खंतही भट यांनी व्यक्त केली. भट म्हणाले, ‘‘आमच्या घराण्यात रबाबवर शास्रीय संगीतच वाजविले जात होते. परंतु, काश्‍मीरमध्ये शास्रीय संगीत ऐकणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या वाद्यावर आता लोकगीत आणि सुगम संगीत वाजवावे लागत आहे.’’

रबाबचा उगम आठव्या शतकात अफगाणिस्तानात झाल्याचे मानले जाते. या वाद्याला १७ ते २२ पर्यंत तारा असता. रागातील तीव्र-कोमल स्वरांनुसार तारांचे ट्युनिंग केले जाते. नंतर वादन केले जाते. त्यातून सर्वप्रकारच्या संगीतातील नादमाधुर्य ऐकायला मिळते.
- अब्दुल हमीद भट, रबाबवादक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abdul hamid bhat says on rabab instrument