क्षण बहराचे : जम्मू आणि काश्‍मीरमध्ये सौहार्दासाठी संगीतसेतू

Abhay-Rustum
Abhay-Rustum

जम्मू आणि काश्‍मीर राज्यातील जनतेला शांत, सौहार्दपूर्ण, सर्जनशील क्षणांची अनुभूती देण्यासाठी आघाडीचे तरुण संतूरवादक व संगीतकार अभय रुस्तुम सोपोरी गेली काही वर्षं मोलाची कामगिरी बजावत आहेत. विद्यार्थी, महिला, सीमेवरील रक्षक, अनाथालयातील मुलं, ज्येष्ठ नागरिक, कैदी यांना संगीताची मेजवानी ते उपलब्ध करून देतात. मनात प्रसन्नता व आशेची ज्योत तेवत ठेवण्यासाठी, माणसाला माणसाशी जोडण्यासाठी त्यांनी हा स्वरसेतू उभारला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोपोरी म्हणाले, ‘‘सा मा पा (सोपोरी ॲकॅडमी ऑफ म्युझिक ॲण्ड परफॉर्मर्मिंग आर्ट)- आलाप हा महोत्सव आम्ही जम्मू आणि काश्‍मीरमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करतो. तेथील जनमानसातील अस्वस्थतेवर उतारा म्हणून हा प्रयत्न आहे. सुमारे साडेचारशे कलावंत यात कला सादर करतात. बाहेरच्या राज्यांमधील नामवंत, स्थानिक प्रसिद्ध कलावंतांबरोबरच उदयोन्मुख तरुणांचाही सहभाग असतो. मी एखादा-दुसऱ्याच मैफलीत संतूरवादन करतो. सीमेवरील कित्येक दुर्गम गावांमध्ये जाऊन कार्यक्रम केले आहेत. 

मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्र बसून संगीत अनुभवणं ही गोष्ट तेथील मंडळींसाठी बिकट झाली आहे. ज्या भूमीत माझे आजोबा पं. शंभूनाथ सोपोरी यांनी सुमारे ३५ हजार शिष्य तयार केले, माझे वडील पं. भजन सोपोरी यांनी तिथल्या मातीचा गंध असलेलं शास्त्रीय संगीत जगभरातील रसिकांपर्यंत नेलं, तीच भूमी तेथे निर्माण झालेल्या अशांत, असुरक्षित वातावरणामुळे आम्ही सोडून आलो. मीही घराण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी संगीतसेवेत रमलो. मात्र मायभूमीतील माणसांच्या मनातील अस्वस्थता निवळावी, यासाठी काही करावंसं वाटलं. १५ वर्षांपासून गावोगावी महोत्सव आयोजित करून जनसामान्यांना संगीतमय वातावरणात वेदना विसरायला लावता आल्या. यासाठी सामाजिक, राजकीय व्यक्ती व प्रशासनाचीही मदत झाली.’’

सोपोरी यांनी असंही सांगितलं की, संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी शिक्षणात कलेचा समावेश असावा, हे म्हणणं मी सातत्याने मांडत आलो आहे. संगीतामुळे भेदाभेद विसरून जातीय सलोखा निर्माण होऊ शकेल. आपल्या संत व साधक कलावंतांच्या उदाहरणांवरून हे लक्षात येतं. एकात्मतेची भावना व्यक्त करणारी गीतं मी तयार केली. मोठया संख्येने मुलं एकरूप होऊन ती गातात. भावी पिढी तोडफोड करणारी, हिंसाचार करणारी न होता परस्परांशी सलोखा, एकरूपता, सामंजस्य व स्नेहभावनेने वागणारी व्हावी, यासाठी संगीतमय पायाभरणी करण्याचा हा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com