मुद्रांक शुल्कासाठी अभय योजना

Home
Home

पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या, नियमापेक्षा कमी भरलेल्या सदनिकाधारकांसाठी अथवा म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी अभय योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्काच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी सूट मिळणार आहे. राज्यातील काही हजार रहिवाशांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

अल्प, मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीयांसाठी म्हाडाकडून घरे बांधली जातात. बांधलेल्या घरांचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने केले जाते. 

त्यामुळे लकी ड्रॉमध्ये एखाद्या नागरिकाला घर लागले, तर त्याला म्हाडाकडून ॲलाटमेन्ट लेटर दिले जाते. २००८ पूर्वी अशा प्रकारे म्हाडाकडून वितरित करण्यात आलेल्या घरांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे सदनिकाधारक सदनिका विक्रीसाठी गेल्यानंतर ज्या वर्षी त्यांना सदनिका मिळाली आहे, त्या वर्षाचा रेडीरेकनरमधील दर आणि त्यावर दर महिना दोन टक्के दंड व्याज मुद्रांक शुल्क विभागाकडून आकारले जाते. चुकविलेल्या मुद्रांक शुल्कासह दंडाची रक्कम विचारात घेतली, तर ती काही लाखांच्या घरात जाते. त्यामुळे नागरिकांना हे पैसे भरणे शक्‍य नाही. एसआरए आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकाधारकांचा देखील हाच प्रश्‍न आहे.

राज्य सरकारच्या हे निदर्शनास आल्यानंतर अशा सदनिकाधारकांसाठी राज्य सरकारकडून अभय योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केल्याशिवाय अशा सदनिकाधारकांचा कायदेशीर मालकी हक्क होत नाही, हा हेतू त्यामागे असल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सरकारकडून अशा सदनिकाधारकांकडून कमी भरलेले अथवा चुकविलेले मुद्रांक शुल्क भरून घेताना त्यावर आकरण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत सवलत दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

किती सवलत हे अद्याप अस्पष्ट 
राज्य सरकारकने अशा सदनिकाधारकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना राबविण्यास मान्यता दिली. परंतु दंडाच्या रकमेत नेमकी किती सवलत मिळणार, संपूर्ण दंड माफ होणार की पन्नास टक्केच सवलत मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्याबाबत कोणताही आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही, असे स्पष्ट करत अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला. 

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. अभय योजनेमुळे म्हाडाच्या अनेक सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे.  मुद्रांक शुल्क भरलेले नाही अथवा कमी भरले आहे, अशा रहिवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com