"दशावतार' बदलतोय कूस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पुणे - गावोगावच्या देवीच्या जत्रांच्या मोसमांत आवर्जून भेटणारा कोकणातला "दशावतारा'चा खेळ, ही कोकणभूमीची व्यवच्छेदक ओळखच ! तब्बल आठ शतकांहूनही अधिक काळाची परंपरा पोटाशी घेऊन आजही आपली उत्साही वाटचाल करणारा दशावतार, बदलत्या काळाशी समरसून स्वतःतही काही बदल करत असून, नेटाने लोकरंजन अन्‌ बोधन करत उभा आहे. म्हणूनच की काय, गेल्या दशकभरात पन्नासहून अधिक नव्या नाटक मंडळींची भर या कलाप्रकारात पडली आहे. विशेष म्हणजे, नवी शिकलेली पिढीही दशावतार करण्यात हिरीरीने पुढे येत आहे. 

एरवी नाटक आणि सांगीतिक मैफलींची अनुभूती रसिकांना देणाऱ्या पुण्यात प्रदीर्घ कालावधीनंतर दशावताराचा खेळ रंगणार आहे. तब्बल तेरा पिढ्यांचा इतिहास असणारी कुडाळ येथील वालावलकर नाटक मंडळी "वीर अभिमन्यू' हा आपला गाजलेला दशावतारी नाट्यप्रयोग सादर करायला खास कोकणातून पुण्यात येत आहेत. याचंच औचित्य साधून "सकाळ'ने मंडळीचे प्रमुख नाथा नालंग यांच्याशी संवाद साधला. 

दशावतारी नाट्यपरंपरेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बाबी नालंग यांचे नाथा हे पुत्र. आपल्या वडिलांनंतर त्यांनी नुसती नाटक मंडळीची धुराच सांभाळली नाही, तर त्यात वाढही केली. ते म्हणाले, ""बदलत्या काळानुसार दशावतार सादरीकरणात आम्ही काही बदल जरूर केलेत. सध्या पूर्वरंग तसाच ठेवून आख्यानात काही प्रमाणात बदल केले आहेत. त्याला विनोदी बाज देणे, त्यात पडद्यांच्या मदतीने काही साचेबद्ध, पण मनोरंजक गोष्टींची जोड देणे, असे भाग आम्ही करू लागलो आहोत.'' 

आमच्याकडील तरुण आणि शिकलेली मुलंही या कलेकडे वळू लागली आहेत. दशावतारात महिला कलाकार नसतात; पण अलीकडे स्वतंत्र महिलांची अशी दोन नाटक मंडळीही यात सहभागी झाली आहेत. छोट्या पडद्यावर ही कला नव्या प्रकारातही सादर होण्यास सुरवात झाली आहे, असंही नालंग यांनी सांगितलं. 

शनिवारी (ता. 15) भीमसेन जोशी कलामंदिरात सायंकाळी साडेचार वाजता हा प्रयोग अनुभवता येईल. 

शासनाला "दशावतारा'चे वावडे का? 
काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने दशावतारासाठी "पॅकेज' देऊ केलं होतं; पण त्यानंतर मात्र ते बंदच झालं. शासनाचं या लोककलेकडे लक्ष नाही. या कलेसाठी शासनाने मनापासून पुढाकार घ्यायला हवा. जाहीर झालेलं पॅकेज मिळवताना असणारे क्‍लिष्ट निकषही बदलावेत, अशी अपेक्षा नाथा नालंग यांनी व्यक्त केली. 

Web Title: About Dashavatar