पाणीकपातीचे संकट टळले!

पाणीकपातीचे संकट टळले!

पुणे - खडकवासला प्रकल्पात  सुमारे चार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराची पाण्याची गरज पाहता हा साठा येत्या जुलैअखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट जवळपास टळले आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून सिंचनासोबतच शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे सिंचनासह काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय, टेमघर धरणात दुरुस्तीच्या कामामुळे यावर्षी पुरेसा साठा नव्हता. प्रकल्पात तुलनेत पाणीसाठा कमी असल्यामुळे एकच उन्हाळी आवर्तन देण्यात आले.

महराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिकेने दररोज ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेणे अपेक्षित आहे. परंतु, शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेकडून दररोज १३५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यानुसार शहराला दर महिन्याला सुमारे दीड टीएमसी पाणी लागते. कालवा समितीकडून १५ जुलैअखेर पाण्याचे नियोजन केले जाते. परंतु, पुढील दोन महिन्यांची गरज पाहता शहराला तीन टीएमसी पाणी लागणार आहे. तसेच, पाण्याचे बाष्पीभवन गृहीत धरल्यास आणखी अर्धा टीएमसी पाणी प्रकल्पात शिल्लक असेल.

खडकवासला प्रकल्पात शहराला १५ जुलैअखेर पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात अडचण नाही. पाणीकपातीचा निर्णय जलसंपदा विभागावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे सध्या शहरातील काही भागांत पुरेशा दाबाने पुरवठा होत नाही.
- व्ही. जी. कुलकर्णी,  पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका 

पुरेसे पाणी नसल्याची तक्रार
शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात कात्रज, धनकवडी, कोंढवा, अप्पर इंदिरानगर, धायरी, वडगाव शेरी यासह शहरालगतच्या काही भागांचा समावेश आहे. धरणात पुरेसे पाणी असूनही पाणी का मिळत नाही, अशी तक्रार करीत पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com