'राष्ट्रउभारणीसाठी देशाविषयीची निष्ठा महत्त्वाची '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

अर्ज न करता दिला "पद्मश्री' पुरस्कार 
केंद्रात आमचे सरकार होते. पंतप्रधानांकडे पद्मश्री पुरस्कारासाठी अर्ज आले होते. अर्ज न केलेल्या क्षेत्रातील व्यक्तींची नावे शोधा, असे तत्कालीन पंतप्रधानांनी सुचविले होते. त्याचवेळी प्रतापराव पवार यांचे नाव समोर आले.

पुणे - ""यशस्वी होण्याकरिता निरीक्षण असावे लागते. निरीक्षणातून परीक्षण घडून स्वतःविषयीचे आत्मचिंतन घडते. या देशाचे साम्राज्य भावी पिढीच्या हाती आहे. मात्र, सामाजिक समतेशिवाय आणि सर्वधर्मसमभावाशिवाय देश पुढे जाऊ शकणार नाही, म्हणूनच राष्ट्रउभारणीसाठी देशाविषयीची निष्ठा महत्त्वाची ठरते,'' असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना शिंदे यांच्या हस्ते "राष्ट्रीय चारित्र्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी लायन्स क्‍लबचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, "सरहद पुणे'चे संजय नहार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता उपस्थित होते. निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी प्रतापराव पवार यांची मुलाखत घेतली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना "चारित्र्य उपासक छात्र' पुरस्काराने गौरविण्यात आले. 

शिंदे म्हणाले, ""काही लोक विनाकारण समाजात विद्रुपता आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण, समाजात सामाजिक समता रुजणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतरही हा देश ढासळेल, असे वक्तव्य ब्रिटिशांनी केले होते; पण अठरा पगड जातींचा हा देश अजूनही एकसंध आहे. त्याचप्रमाणे मन, चारित्र्य संपन्न असेल, तर राष्ट्रउभारणीचे विचार मनात येऊ शकतात. लोकमान्य टिळक, आगरकर यांनीही स्वातंत्र्यपूर्व काळात समाजबांधणीचे कार्य केले. समाज चिंतनातून आणि पुस्तकांच्या वाचनातूनही मनुष्य घडतो, हे नव्या पिढीने जाणून घ्यावे.'' 

पत्रकारितेविषयी शिंदे म्हणाले, ""समाजाला हलवून सोडण्याची आणि जनजागृतीची ताकद वर्तमानपत्रात असते. स्वतंत्रता हे पत्रकारितेचे मूळ आहे. ते स्वतंत्रपणानेच चालविले पाहिजे, तरच ते टिकते. हे कार्य प्रतापराव पवार यांनी नेमकेपणाने हेरले आहे. म्हणूनच बाळशास्त्री जांभेकर यांची परंपरा प्रतापराव पुढे नेऊ शकतात, ही दूरदृष्टी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती, म्हणूनच त्यांनी प्रतापराव पवार यांना वर्तमानपत्राची जबाबदारी सांभाळण्यास सांगितले.'' 

मुलाखतीदरम्यान पवार म्हणाले, ""मी कधीही पद मागितले नाही. कारण, पद मिळावे अशी अपेक्षा कधीही नव्हती. आयुष्यात कार्य करताना अनेक सामाजिक कार्यकर्ते भेटले. त्यांच्यासोबत कार्य करीत राहिलो. जे केले ते निरपेक्षवृत्तीने करीत आलो. ज्या गोष्टी जमल्या त्याबद्दल मनापासून आनंद आहे. चांगले काम केले त्याची नोंद लोकांनी घेतली.'' प्रणव मेहता यांनी आभार मानले. 

अर्ज न करता दिला "पद्मश्री' पुरस्कार 
केंद्रात आमचे सरकार होते. पंतप्रधानांकडे पद्मश्री पुरस्कारासाठी अर्ज आले होते. अर्ज न केलेल्या क्षेत्रातील व्यक्तींची नावे शोधा, असे तत्कालीन पंतप्रधानांनी सुचविले होते. त्याचवेळी प्रतापराव पवार यांचे नाव समोर आले. "पद्मश्री'साठी त्यांनी अर्ज केला नव्हता. त्यांचे ज्येष्ठ बंधू शरद पवार यांनीही आपल्या भावासाठी पद्मश्रीबद्दल कल्पना मांडली नाही. बारामतीसारख्या गावातून आपल्या विद्वत्तेवर प्रतापरावांनी कर्तृत्व घडविले. म्हणून अर्ज न करताही त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवून केंद्र सरकारने त्यांची पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची नोंद घेतली, असे गौरवोद्‌गार शिंदे यांनी काढले.

Web Title: About nation-building trust is important for the country