#PuneBRT : मेट्रोचे स्वागत करताना बीआरटीकडे दुर्लक्ष

brtroad-pune
brtroad-pune

स्वारगेट - वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गाजावाजा करीत 13 वर्षांपूर्वी शहरात आणलेल्या "बीआरटी'वर सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला, तरी तिची रडरड कायम आहे. सातारा रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर बीआरटीचे काम तीन वर्षे झाले, तरी अद्यापही सुरूच आहे. एखाद्या चांगल्या योजनेचा महापालिकेतील काही घटक कसा खेळखंडोबा करतात, याचे बीआरटी हे उत्तम उदाहरण! आता या रस्त्यावर मेट्रोच्या नावाखाली पुन्हा साडेतीन हजार कोटींचा प्रकल्प आणायची सत्ताधाऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. 

कमीत कमी वेळेत स्वतंत्र बसमार्गाद्वारे प्रवाशांची विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या मार्गाला व वाहतूक व्यवस्थेला "बस रॅपिड ट्रान्झिट' (बीआरटी) असे म्हटले जाते. बस वापरून केलेली रस्त्यावरील मेट्रो असे तिचे स्वरूप आहे. दक्षिण अमेरिकेतील क्‍युरितीबा येथे स्वस्तातील मेट्रो या भावनेतून ही संकल्पना राबविली गेली. मेट्रोपेक्षा कमी खर्च; परंतु प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता उत्तम, यामुळे ही संकल्पना दक्षिण अमेरिका खंडातील बोगोटासह अनेक शहरांत यशस्वी ठरली. 

देशात सर्वप्रथम पुणे बीआरटीची मुहूर्तमेढ रोवली गेली. डिसेंबर 2006 मध्ये कात्रज ते हडपसर 15 किलोमीटरच्या पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात झाली. या मार्गावर सुरुवातीला 10 व्होल्हो बस धावत होत्या. बीआरटीला चांगला प्रतिसाद मिळू लागला म्हणून शहरात 12 प्रमुख रस्त्यांवर 100 किलोमीटरची बीआरटी निर्माण करण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही झाले. पण, 2012 मध्ये पुन्हा नव्याने आखणी केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून 2015 मध्ये 38 किलोमीटर "रेनबो बीआरटी'ची सुरुवात झाली. परिणामी, प्रवासी वाढले आणि 12 टक्के प्रवासी दुचाकी सोडून बीआरटीकडे वळले होते. 

नवे मार्ग सुरू होताना सातारा रस्त्यावरील बीआरटीची फेररचना करण्याची हुक्की महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांच्या मनात आली. 2016 मध्ये सुधारणांच्या आराखड्यासाठी स्थानकांसह सगळा खर्च 80 कोटी रुपये होता. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु, त्यानंतर स्थानकांसाठी 38 कोटी रुपये आणखी लागतील, असे ठेकेदार, प्रशासनातील काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना वाटले अन्‌ पुन्हा निविदांच्या प्रक्रियेत हा प्रकल्प अडकला. डिसेंबर 2018 मध्ये अपेक्षित असलेला हा प्रकल्प पुढील वर्षी जानेवारीमध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 

बीआरटीचा फायदा 
- बीआरटी मार्गावर एक बस 80-100 खासगी वाहने कमी करू शकते 
- स्वतंत्र मार्गामुळे प्रवासी वाहतूक वेगाने 
- बसची झीज कमी होते, सरासरी डिझेल कमी लागत असल्याने इंधनात बचत 
- खासगी वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रदूषण कमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com