एसी बस खरेदी रद्दचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - शहरातील बीआरटी मार्गांसाठी ५५० वातानुकूल (एसी) बस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तसेच, ८०० बस विकत घेण्यासाठी फेरनिविदा काढण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रस्तावांवर बुधवारी निर्णय होणार आहे. दरम्यान, पीएमपीच्या ताफ्यात बस कशा पद्धतीने वाढवायच्या, हेदेखील या वेळी ठरणार आहे. 

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकींग्ज’च्या (एएसआरटीयू) माध्यमातून ५५० एसी बस पीएमपीसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, बीआरटी मार्गावर एसी बस परवडतील का, प्रवासी भाडे वाढवावे लागेल आदी कारणांमुळे संचालक मंडळाच्या बैठकीत त्याला विरोध झाला होता. तसेच निविदाप्रक्रियेलाही १२० दिवसांहून अधिक कालावधी झाला होता. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बससाठीची निविदाप्रक्रिया रद्द करणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला होता. पीएमपीच्या आर्थिक हितासाठी संचालक मंडळ निविदाप्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे पिंपरी -चिंचवड महापालिकेने म्हटले होते.

तर, ट्रान्झिट ऑपरेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीला निविदाप्रक्रिया रद्द झाल्याबाबत कळविण्यात आले असेल, तर फेरनिविदा करावी. संबंधित संस्थेस कळविले नसेल, तर संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घ्यावा, असे पुणे महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया संचालक मंडळाच्या बैठकीत रद्द होण्याची शक्‍यता आहे.

‘तेजस्विनी’चा निर्णय बुधवारी 
महिलांसाठी ‘तेजस्विनी बस’ सेवेसाठी राज्य सरकारने दिलेल्या १० कोटी रुपयांतून ३३ बस खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संचालक मंडळाची बुधवारी औपचारिक मंजुरी मिळाल्यावर, या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरवात होणार आहे. प्रत्येक बसची किंमत ३० लाख ६५ हजार रुपये इतकी आहे.

Web Title: AC Bus purchasing proposal reject