पादचाऱ्यांसाठी येणार ‘अच्छे दिन’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता यावे, यासाठी खास सुविधा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाईड लाइन्स) विविध सेवा पुरविण्याचे नियोजन केले आहे. जंगली महाराज रस्त्यावर त्याचे काम सुरू झाले असून, इतर रस्त्यांवरही ते करण्यात येणार आहे. 

पुणे - वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता यावे, यासाठी खास सुविधा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाईड लाइन्स) विविध सेवा पुरविण्याचे नियोजन केले आहे. जंगली महाराज रस्त्यावर त्याचे काम सुरू झाले असून, इतर रस्त्यांवरही ते करण्यात येणार आहे. 

पथ धोरणानुसार जंगली महाराज रस्त्यापाठोपाठ फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि लालबहादूर शास्त्री रस्ता या चार रस्त्यांवरील पदपथाची रुंदी वाढवून तेथे पादचाऱ्यांसाठी निरनिराळ्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यात विद्युत व्यवस्था, महिला-पुरुषासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था आदींचा समावेश आहे. या रस्त्यांवरील पदपथांची रुंदी दहा ते पंधरा फुटांपर्यंत राहणार आहे. येत्या वर्षभरात चारही रस्त्यांवरील हे काम पूर्ण होईल, असा दावा पुणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्प्यातील काम जंगली महाराज रस्त्यावर सुरू झाले असून, ते पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. या रस्त्यावरील हा प्रकल्प पथदर्शी असून, याच धर्तीवर पुढील रस्त्यांची कामे करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.  

पथ धोरणातील सुविधा 
ज्या रस्त्यावर पादचाऱ्यांची संख्या अधिक आहे, तेथील पदपथ अधिक रुंद होणार

पदपथावरून एकाच वेळी (समांतर) चार ते पाच पादचाऱ्यांना चालता येऊ शकेल 

पादचाऱ्यांच्या आसनव्यवस्थेसाठी जागोजागी बाकड्यांची व्यवस्था असणार 

पदपथावरील झाडांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, त्यामुळे वातावरण प्रफुल्लीत राहील

चारही रस्त्यांच्या कामासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे नियोजन 

महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) या कामासाठी तरतूद करण्यात येणार 

मागील अर्थसंकल्पातील १० कोटी रुपयांमधून जंगली महाराज रस्त्याचे काम सुरू  

पादचाऱ्यांच्या सोयीसाठी शहरात धोरण राबविण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात सर्वाधिक वर्दळीचा लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि लालबहादूर शास्त्री रस्ता येथे हे धोरण राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. ही कामे करताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे.
- राजेंद्र राऊत, प्रमुख, महापालिका पथ विभाग  

Web Title: acche din to footer