किरकोळ अपघात....मारहाण अन्‌ वाहतुकीचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

वाघोली - पुणे-नगर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर मोठ्या वाहनांच्या चालकांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. महामार्गावरच हा वाद होत असल्याने अनेकदा वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. चार दिवसांपूर्वी एका एसटीचालकाला, तर बुधवारी रात्री एका ट्रकचालकाला मारहाण करण्यात आली. 

वाघोली - पुणे-नगर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर मोठ्या वाहनांच्या चालकांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. महामार्गावरच हा वाद होत असल्याने अनेकदा वाहतुकीचाही बोजवारा उडत आहे. चार दिवसांपूर्वी एका एसटीचालकाला, तर बुधवारी रात्री एका ट्रकचालकाला मारहाण करण्यात आली. 

पुणे-नगर महामार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर आहे. अशा कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रकार घडतात. अशा वेळी छोटे वाहनचालक स्थानिक असेल, तर ते तिथेच वाहने थांबवून मोठ्या वाहनचालकाला मारहाण करतात तसेच गोंधळ घालतात. अशा प्रकारामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो. पोलिस घटनास्थळावर दाखल होईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अशा घटनेत मोठ्या वाहनचालकाचीही बऱ्याच वेळा चूक असते. भर गर्दीत ते बेशिस्तपणे वाहन चालवतात. यामुळे असे प्रकार घडतात, तर मोटारचालकांचा भरधावपणा व घाईही कारणीभूत ठरते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.
 

घटना एक
स्थळ - पुणे-नगर महामार्ग (बीजेएस कॉलेजजवळ), वेळ - दुपारी एक. सोमवारी एका एशियाड बसचा मोटारीला किरकोळ धक्का लागला. त्या मोटारीतील युवकांनी बसचालकाला ओढून मारहाणीस सुरवात केली. भर महामार्गावरच हा प्रकार सुरू झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे बसमधील प्रवासी घाबरले. अखेर पोलिसांना ही घटना कळाली. त्यांनी येऊन परिस्थिती हाताळली. मात्र, तोपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

घटना दोन  
स्थळ - पुणे-नगर महामार्ग (आव्हाळवाडी चौक), वेळ - रात्री ९.३०. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालकाला एक स्थानिक नागरिक दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होता. काय प्रकार झाला ते कोणालाही कळत नव्हते. ट्रकचालक खाली उतरला होता. ट्रक महामार्गावरच असल्याने वाहतूक खोळंबली होती. अखेर तेथील काही नागरिकांनी त्या स्थानिकाला आवरले. तो दारूच्या नशेत होता. त्यानंतर ट्रकचालक निघून गेला.

Web Title: accident beating, traffic