बीआरटी मार्गाने जायचे की सेवा रस्त्याने या गोंधळात होतात अपघात

कुंदननगर, कासारवाडी - पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने.
कुंदननगर, कासारवाडी - पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने.

पिंपरी - बीआरटी मार्गाने जायचे की सेवा रस्त्याने, या गोंधळात वाहनचालक पडत असल्याने पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी ते कासारवाडी या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर वारंवार अपघात होत आहेत. त्याची प्रचिती मंगळवारीही (ता. २६) आली. कुंदननगर, फुगेवाडी जकात नाका या अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरात अवघ्या दोन तासात दोन अपघात झाले. यात चार वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. 

पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते मोरवाडी-पिंपरीदरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य मार्ग रहदारीस बंद ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला सेवा रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यावरील रहदारीचा ताण कमी व्हावा, यासाठी बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश खुला आहे. मात्र, सेवा रस्त्यावरून बीआरटी मार्गात जाताना किंवा बीआरटी मार्गातून सेवा रस्त्यावर येताना किंवा दोन्ही पैकी कोणत्या मार्गातून जायचे या गोंधळात चालकांकडून वाहनांवरचे नियंत्रण सुटते व अपघात होतात, असे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. 

कुंदननगरला विचित्र अपघात
कासारवाडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुंदननगर येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. या ठिकाणी सेवा रस्त्यावरून बीआरटी मार्गावर जाता येते. याच प्रयत्नात एक मोटारचालक होता. कोणत्या मार्गाने जावे, या विचारात असतानाच त्याला मागून आलेल्या मोटारीची धडक बसली. तिला ट्रकची धडक बसली. त्यामुळे एक मोटार रस्त्यावर आडवी झाली, तर दुसरीची दिशा बदलली. मोटारींचे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघातामुळे कासारवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

तासाभरात दुसरा अपघात
पुण्याकडून पिंपरीकडे जाणारा मुख्य मार्गही मेट्रोच्या कामामुळे रहदारीसाठी बंद आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग खासगी वाहनांसाठी खुला आहे. फुगेवाडी जकात नाक्‍याजवळून बीआरटी मार्गावर जाता येते. त्यामुळे बीआरटी मार्गाने जायचे की, सेवा रस्त्याने या गोंधळामुळे मोटारचालकाचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. सेवा रस्ता व बीआरटी रस्त्याच्या मधील दुभाजकावर मोटार चढली व अडकून पडली. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

चिंचवड स्टेशनलाही अपघात
पुणे-मुंबई महामार्गाने मोरवाडी चौकातून चिंचवड स्टेशनकडे जाताना पोलिस उपायुक्त कार्यालयालगत सेवारस्त्यावरून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी मार्गिका ठेवली आहे. पुढे सेवारस्त्यावरूनच बीआरटी बस धावतात. मंगळवारी दुपारी सेवारस्त्यावरून बीआरटी मार्ग ओलांडत मुख्य रस्त्यावर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराला मागून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या दुखापत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com