पुण्यात कात्रज चौकात आणखी किती जणांचा जाणार बळी?

katraj chowk accident
katraj chowk accident

कात्रज - पीएमपीच्या थांबलेल्या बस उताराला लागून वाहनांना धडकण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. कात्रज चौकातील जुन्या बस स्थानकात थांबलेली बस उताराने अचानक मागे येऊन चार मोटारींना धडकली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. 

हडपसरकडून आलेली बस कात्रजच्या जुन्या बस स्थानकात थांबली होती. भाडेतत्त्वावर चालणाऱ्या बसचा चालक बस नोंदवण्यासाठी नियंत्रण कक्षाकडे गेला. हडपसर कडून आलेले प्रवासी उतरले आणि नवीन प्रवासी बसमध्ये बसू लागले तोच बस उताराने मागे जाऊ लागली. चालक नसताना बस मागे जात असल्याचे पाहून प्रवाशी उतरू लागले. 

काहींनी तर उड्या मारल्या. तीव्र उतार येताच वेगाने बस धावणार तोच मार्गात उभ्या केलेल्या मोटारींना बस धडकली आणि थांबली. यामुळे परिसरात एकच गोंधळ झाला. आडव्या उभा असलेल्या चार मोटारींनी भिंतीचे काम केले. अन्यथा मोठ्या दुर्घटनेसह जीवित हानी निश्‍चित झाली असती. सचिन तारू यांच्या मोटारीचे मोठे नुकसान झाले. 

स्थानिक पोलिस आणि पीएमपीच्या अपघात विभागातील अधिकारी घटनास्थळी तत्काळ आले आणि पंचनामा केला. 

उतारावर असलेल्या या बसस्थानकात सर्वच चालक हॅंडब्रेक लावतात आणि खबरदारी म्हणून मागच्या चाकाखाली दगड ठेवतात. तशी कोणतीही उपाययोजना न करता बस चालक मात्र पसार झाला. तब्बल तीन तास ठेकेदारांकडून कोणीच घटनास्थळी न आल्यामुळे नुकसान झालेले मोटार मालक संतापले. दरम्यान मोटार मालक तारू यांनी ठेकेदाराविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.

बस चालक बेजबाबदारपणे बस उभारून जात असल्यामुळे कात्रज येथील बीआरटी बस स्थानक, सावंत  कार्नर बस स्थानक आणि जुन्या बस स्थानकात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटनात आजवर सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या पंधरा वर्षांत शेकडो घटना घडूनही पीएमपी प्रशासन, महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग कोणतीच उपाययोजना करत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

बसस्थानक परिसराच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ केली जाईल. ठेकेदारांच्या बस चालकांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत. वरिष्ठांनीही बसस्थानक परिसराला भेट दिली, त्या वेळी नागरिकांच्या मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यापुढे आवश्‍यक ते बदल केले जाणार आहेत. 
- विक्रम शितोळे, आगार प्रमुख, कात्रज    

बस थांबे स्थलांतरित करण्याची मागणी 
कात्रज चौकातील वाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्या पीएमपीचे बस थांबे आरक्षित जागेत स्थलांतरित करा आणि कात्रज चौक अपघातमुक्त करा, अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत. दक्षिण पुणे प्रवासी मंचाने व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनाही निवेदन दिले आहे. सातारा जिल्हा मित्र मंडळाने वारंवार प्रवासी दिनाला उपस्थित राहून कात्रज आगार प्रमुखांकडे सतत पाठपुरावा केला आहे. तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com