शिरुरजवळ भीषण अपघातात दोन मृत्युमुखी

नितीन बारवकर
गुरुवार, 11 मे 2017

अपघाताच्या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने दोन्ही वाहनांची जवळपास समोरासमोरच धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहने एकमेकांत गुंतून बसली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली

शिरूर - शिरूर- न्हावरे रस्त्यावर कर्डे घाटाच्या पायथ्याजवळ आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगातील कंटेनर व खडीची वाहतूक करणारा डंपर ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. कंटेनरच्या मागून येणारी मोटारही कंटेनरवर आदळल्याने मोटारचालक मच्छिंद्र दशरथ शिनलकर (रा. आंबळे, ता. शिरूर) किरकोळ जखमी झाले.

सुनील किसन पवार (वय 35) व सोनदत्त शर्मा (वय 30) अशी मृत्युमुखी पडलेल्याचालकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार -  खडीने भरलेला डंपर (क्र. एमएच 12 एचडी 5791) न्हावरे फाटा येथून न्हावऱ्याच्या दिशेने जात असताना, कर्डे घाटाच्या उतारावरून शिरूरच्या दिशेने जाणारा भरधाव वेगातील कंटेनर (क्र. पीबी 11 बीवाय 1763) घाट उतरून डंपरवर ट्रकवर आदळला.

अपघाताच्या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने दोन्ही वाहनांची जवळपास समोरासमोरच धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहने एकमेकांत गुंतून बसली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी पोलिस दलासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रांजणगाव एमआयडीसीतून दोन जेसीबी व इतर यंत्रसमाग्री बोलावून घेतल्यानंतर ही वाहने बाजूला केली गेली. तरीही दोन्ही मृत चालक अवघड स्थितीत वाहनांत अडकून पडले होते.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी किशोर सरोदे, बंटी कुंडलिक, अमोल वर्पे, दत्ता केदारी, सुभाष चौधरी, संतोष सरोदे या स्थानिक तरूणांच्या मदतीने वाहनांमध्ये अडकलेले चालकांचे मृतदेह बाहेर काढले.

दोन तास वाहतूक ठप्प
या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजूंना किमान दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तीन जेसीबी व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली व चालकांचे मृतदेहही बाहेर काढले. त्यानंतर तब्बल दोन तासांनी म्हणजे अडीच वाजता या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Accident near Shirur kills 2