पुणे : लवळे फाट्यावर भीषण अपघात; चार ठार, एक गंभीर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पिरंगुट (ता. मुळशी) येथील लवळे फाट्यावर मद्यधुंद टेंपोचालकाने दोन दुचाकींना फरफट नेत चौघांचा बळी घेतला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवार) रात्री नऊच्या सुमारास झाला.  

पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील लवळे फाट्यावर मद्यधुंद टेंपोचालकाने दोन दुचाकींना फरफट नेत चौघांचा बळी घेतला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवार) रात्री नऊच्या सुमारास झाला.  

वैष्णवी सुनील सोनवणे (वय 20, सध्या रा. पौड, ता. मुळशी), पूजा बंडू पाटील (वय 17, सध्या रा. पिरंगुट, ता. मुळशी), नागेश अंकुश गव्हाणे (वय 21, सध्या रा. पिरंगुट, मूळ रा. कागडखेल, ता. आष्टी. जि. बीड) व एक अनोळखी तरुण (अंदाजे वय 20) हे चौघे मृत्युमुखी पडले आहेत. जखमी व एक मृत व्यक्तीचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. वैष्णवी ही तरुणी हिंजवडी येथील विप्रो कंपनीत नोकरीला होती. पूजा ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. 

पोलिसांच्या माहितीनुसार, येथील पिरंगुट घाटातून पौडकडे आयशर टेंपो (एमएच 15, जीव्ही 9011) भरधाव जात होता. लवळे फाटा येथील तीव्र उतारावर या टेंपोचालकाने दोन ते तीन ठिकाणी दोन दुचाकींना ठोकरत फरपट नेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना पोलिस मित्र विजय पवळे यांच्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल केले. ग्रामस्थांच्या माहितीनुसार टेंपोचालक दारू प्यालेला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने दोन दुचाकींना फरपटत नेले. 

मिरवणूक रद्द केल्याने अनर्थ टळला 

पिरंगुट येथील बालवीर युवक मंडळाने मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले होते. मात्र, काही कारणास्तव मंडळाकडून विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आली. विसर्जन मिरवणूक असती तर मोठा अनर्थ घडला असता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Pirangut Road Pune 4 Died