पुणे : खडी मशिन चौकात अपघाताचा थरार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

गोकूळनगर - लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने  ट्रेलरने समोरून जाणाऱ्या एका मोटारीला जबर धडक दिली. त्‍यामुळे एकामागे एक जाणाऱ्या चार मोटारी एकमेकांवर आदळल्‍या. त्यात एक मोटार दुसऱ्या मोटारीच्या बॉनेटवरून टपावर चढली. अंगावर थरकाप उडविणाऱ्या या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज सकाळी अकराला कोंढवा येथील खडी मशिन चौकात हा अपघात झाला.

लोखंडाच्या प्लेट घेऊन जाणारा ट्रेलर (एमएच ४६--एच१०४२) कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मंतरवाडीच्या दिशेने जात होता. ट्रेलरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पहिल्यांदा एका इनोव्हाला जोरदार धडक दिली. त्यामुळे इनोव्हा कार पुढील कारवर आदळली. त्यानंतर याच पद्धतीने दोन मोटारी एकमेकांना धडकल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही कळण्याच्या आतच डस्टर कारला पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला.

परिणामी, डस्टर कार पाठीमागे असलेल्या होंडा सिटीच्या बॉनेटवरून टपावर आदळली. विचित्र पद्धतीने अपघात होऊनही सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारमध्ये अडकलेल्या चालक व नागरिकांना बाहेर काढले.त्यानंतर क्रेन मागवून एकमेकांमध्ये अडकलेल्या मोटारी बाजूला काढण्यास सुरवात केली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेऊन, वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न केला. एक तासानंतर ती सुरळीत होण्यास मदत झाली. दरम्यान, या अपघातानंतर ट्रेलरचा चालक उडी टाकून पळून गेला.

रस्ता रुंदीकरणाचे टेंडर पे टेंडर
कात्रज- कोंढवा-रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून चार वर्षांपासून निविदा काढणे आणि त्या रद्द करण्याचा प्रकार सुरू आहे. आता पाचव्यांदा निविदा काढल्या आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर महापालिका रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेणार आहे,  निविदा सातत्याने का रद्द केल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

Web Title: Accident in Pune