
Accident News : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू दोन जण जखमी
मंचर : पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ एकलहरे (तालुका आंबेगाव )येथे जुन्या रस्त्यावर गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी गाडीने धडक दिली या अपघातात एका वारकऱ्याचा उपचारादरम्यानमृत्यू झाला असून दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
बोरगाव (तालुका कवठेमहाकाळ जिल्हा सांगली )या भागातील वारकरी आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलीप नामदेव सुतार (वय 60 )पांडुरंग जयवंत मंडले (वय 40 ) वसंत विष्णू पाटील (वय 50 )सर्व राहणार बोरगाव (तालुका कवठेमहाकाळ जिल्हा सांगली) येथील आहेत.
श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे वारकरी खाजगी जीप व टेम्पोतून एकूण 27 वारकरी आळेफाटा येथे मुक्कामी थांबणार होते. तेथून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठीजाणार होते.
एकलहरे येथे जुन्या रस्त्यावर लघुशकेसाठी वारकरी थांबले होते. पुण्याहून नाशिकला जाताना वारकरी डाव्या बाजूलाच उभे होते. दरम्यान पुणे तेअकोले एसटी (एम एच ०७- ९२०३) भरधाव आली . चालकाचे एसटी वरील नियंत्रण सुटले.
एसटीची धडक बसल्याने तीनही वारकरी रस्त्यावर कोसळले. एकलहरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ लक्ष्मण सूर्यवंशी व इतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी मंचर पोलिसांकडे संपर्क केल्यानंतर पोलीस हवालदार नंदकुमार आढारीव ,योगेश रोडे घटनास्थळी आले.
त्यांनी रुग्णवाहिकेतून तिघांनाही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उपचारादरम्यानच सुतार यांचा मृत्यू झाला. असे वैद्यकीय अधीकारी डॉक्टर सुशील कांबळे यांनी सांगितले. दरम्यान एसटीचे चालक बाळासाहेब विलास वीधनवडे राहणार सावरगाव तालुका संगमनेर यांच्याकडे पोलीस अपघाताबाबत चौकशी करत आहेत याप्रकरणी पुढील तपास आढा री करत आहेत.