दुभाजक ओलांडलेल्या मोटारीने घेतले दोन बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव (ता. दौंड) हद्दीत मोटार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. मोटारीने दुभाजक ओलांडल्याने दुचाकीस्वारांचा हकनाक बळी गेला आहे. अमोल अशोक कदम (वय 32) व तुषार गोरख माळवदकर (वय 32, दोघे रा. दौंडज, ता. पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत.

केडगाव (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव (ता. दौंड) हद्दीत मोटार व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. मोटारीने दुभाजक ओलांडल्याने दुचाकीस्वारांचा हकनाक बळी गेला आहे. अमोल अशोक कदम (वय 32) व तुषार गोरख माळवदकर (वय 32, दोघे रा. दौंडज, ता. पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम व माळवदकर हे दौंड येथे एका रुग्ण नातेवाइकास भेटण्यासाठी जात होते. महामार्गावरील सर्जा हॉटेलजवळ त्यांची दुचाकी आली असताना महामार्गावरून पुण्याकडे जाणारी मोटार (एमएच 42 एएच 3457) वेगात दुभाजक ओलांडून दुचाकीला धडकली. अपघातानंतर दुचाकीचे नुकसान झाले तर मोटरही उलटली.

अपघातात कदम व माळवदकर यांच्या हात, पाय, डोक्‍यास मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना चौफुला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार घेत असताना त्यांच्या मृत्यू झाला. मोटारचालक अमित ज्ञानदेव पाटील (रा. अकलूज, जि. सोलापूर) अपघातानंतर पळून गेला. कदम व माळवदकर हे दोघे मित्र होते. त्यांच्या मृत्यूने दौंडज गावावर शोककळा पसरली आहे. दौंडज येथे सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी
पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजकाची उंची अत्यंत कमी आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर वाहने सहज दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये जात आहेत. गेल्या महिन्यात लोणी काळभोर येथे यवतमधील नऊ जणांचा मृत्यू अशाच प्रकारच्या अपघातात झाला आहे. अशा घटनांमध्ये प्रवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांचा हकनाक बळी जात आहे. दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident On Pune Solapur Highway