इंदापूरजवळ खासगी बसला अपघात; 4 ठार

संदेश शहा
शनिवार, 21 जानेवारी 2017

अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

पुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ आज (शनिवार) सकाळी सहाच्या सुमारास खासगी बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, 16 जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादहून मुंबईकडे जात असलेल्या खासगी बसला इंदापूरजवळील राऊत हॉटेल येथे अपघात झाला. या अपघातात बसमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 16 जण जखमी आहेत. जखमींना इंदापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की अपघातातील तीन जणांचे शीर धडावेगळे झाले होते. सरडेवाडी टोल नाक्यावरुन इंदापूरकडे भरधाव वेगाने येताना बस रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला जाऊन तिनदा उलटली.

मृतांमध्ये हैदराबादमधील तिघांचा आणि लातूरमधील एकाचा समावेश आहे. जी. करणाकर (वय 32), विशाल लाड (वय 35), आमीर उल्ला खान (वय 35) व श्रवण केंद्रे (वय 25) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. ही बस एम्पायर ट्रॅव्हल्स या कंपनीची असल्याचे सांगण्यात येत आहे. निलेश गोडबोले (रा. बदलापुर) हे गंभीर जखमी आहेत. एका प्रवाशाकडे सापडलेल्या मोबाईलमुळे मृतांच्या नावाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतांचे नातेवाईक हैदराबादहून निघाले असून, त्यानंतर त्यांची ओळख पटविण्यात येईल. पोलिस निरीक्षक सज्जन हंकारे पुढील तपास करीत आहे.

Web Title: accident on Pune-Solapur highway 4 dead