किल्ले पुरंदरवर अपघात; 3 ठार, 2 जखमी

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

- किल्ले पुरंदरवर झाला हा अपघात. 

- वाहन कोसळले चाळीस फूट खोल

सासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस फूट खोल कोसळून अपघात झाला. त्यात तीनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. काल (ता.17) सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद आज पहाटे नोंदविली. तर संबंधित याबाबत ट्रान्जेट मिक्सर वाहनचालकास आज दुपारी अटक करण्यात आली आहे.

या अपघातात आनंद श्यामलाल पनिका (वय 20, रा. दिलवाले, पो. करवाही ता. म्हणशील, जि. सिद्धी - मध्य प्रदेश), मोनो रमेश बैगा (वय 21, रा. चहाही नगरपरिषद, ता. थाना. जि. मजीवली - मध्यप्रदेश), अनिल ब्रिजनंदन पनिका (वय 21, रा. कुशमहर ता. सिद्धी - मध्य प्रदेश), तर जखमींची नावे पुढीलप्रमाणे ः रामबहर  भवर बैगा (वय 19, रा. चरणी, ता. रामपूर, जि. सिध्दी - मध्यप्रदेश), राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय 23, रा. हाटवा, बरहटोला, ता. सिहवल, जि. सिध्दी - मध्यप्रदेश). या अपघाताला जबाबदार धरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

चालक आरोपीचे नाव राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय 23, रा. घर नंबर 23, हाटवा बरहटोला, पो. हाटवा खास ता. सिहवल जि. सिध्दी - मध्यप्रदेश) असे आहे. घटनेबाबत फिर्यादी प्रशांत भुजीग धुळूगडे (वय 28, रा. सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापुर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. जखमींना उपचाराला दाखल केले आहे. तर मृतांचे शवविच्छेदन करुन त्यांचे मृतदेह गावी पाठविल्याचे सांगण्यात आले. 

काल (ता.17) सायंकाळी पावणेसहा वाजता पुरंदर किल्ल्यावरील तळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. तिथे ट्रान्जेट मिक्सर गाडी (एमएच 12, एफसी 6026) आवश्यक बंचिंग प्लांटवर माल भरून मुरारबाजी चौकातील तलावाजवळ आली. तिथे माल खाली करताना उतारावर चालकाला वाहन नियंत्रित ठेवता आले नाही. त्यातून मिक्सर वाहन मागे आले व दरीमध्ये सुमारे 40 फूट खाली कोसळले.

दरम्यान, चालकाने उडी मारली. तर तीनजण यात ठार झाले व दोनजण जखमी झाले, अशी माहिती सासवड पोलिस ठाण्यातून आज देण्यात आली. ही फिर्याद सहाय्यक फौजदार एस. एन. महाजन यांनी दाखल केली. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Accident on Purandar Fort 3 Died 2 Injured