अपघात नियंत्रण यंत्रणा तोकडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

रस्त्याचे सर्वेक्षण करावे
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत गावे आहेत. त्यामुळे येथे वाहनांच्या वेगावर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे. रस्ते विकास महामंडळाने पुन्हा एकदा या रस्त्याचे सर्वेक्षण करावे आणि अपघात कमी करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावे असणाऱ्या ठिकाणी वेगातील वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी तिथे स्पीडब्रेकर किंवा रंम्बलिंग स्ट्रीप लावण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड ते कान्हे फाटादरम्यान दहा ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. सोमाटणे फाटा आणि वडगाव फाटा येथे दर महिन्याला गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. महामार्गावर असणाऱ्या गावालगतच्या परिसरात स्पीडब्रेकर नसणे, वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम नसणारी यंत्रणा यामुळेच ही अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॉट) तयार झाली आहेत. 

    देहूरोड-कात्रज बायपास हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मुंबईच्या दिशेने वेगात येणारी वाहने आणि कात्रजकडून पिंपरी-चिंचवड शहराकडे वळणाऱ्या वाहनांमुळे या चौकात अपघाताची शक्‍यता आहे. या चौकाला जोडणाऱ्या रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्याने इथून वाहनांची ये-जा कायम सुरू असते. याच परिसरात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा नाही. 

    सोमाटणे चौकाच्या अलीकडे शिरगावकडून येणारी वाहने पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी वळतात. तेथेच मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असते.

    सोमाटणे फाटा परिसरातील चौकातील वाहतुकीची स्थिती गंभीर आहे. द्रुतगती महामार्गाकडून आणि तळेगावकडून येणारा रस्ता एकाच ठिकाणी मिळतात. पुण्याकडून येणारी वाहने तिथूनच जातात. तळेगावकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. हा चौक ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो.

    तळेगावातून जुन्या महामार्गावर येणारा रस्ता धोकादायक आहे. सकाळी व संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या गर्दीमुळे रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. चौकात सिग्नल यंत्रणा नाही. 

    महामार्गावरील वडगाव फाटा चौकात चार ठिकाणाहून रस्ते येतात. मुख्य चौकात दिव्यांची व्यवस्था नाही, महिन्याला किमान आठ ते दहा अपघात येथे होतात.

    वडगावमधून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा होतो. अनेक जड वाहने इथल्या चौकात वळण घेतात, त्यामुळेही छोटे-अपघात होतात. 

    या महामार्गावर मोहितेवाडी, जांभूळगाव, ब्राम्हणवाडी, आणेफाटा या गावांजवळील परिस्थिती गंभीर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident Spot highway Traffic issue