मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीमुळे अपघाताचा धोका 

Accidental hazard due to dilapidated school buildings
Accidental hazard due to dilapidated school buildings

पिरंगुट : लवळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेले सुमारे वर्षभऱ येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरून शेजारच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहेत. धोकादायक  अवस्थेत असलेली ही इमारत तातडीने पाडावी, अशी मागणी रवींद्र शितोळे व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार करूनही अद्याप त्य़ाची दखल घेतलेली नाही. कोणत्याही प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनीही याबाबत गांभिर्याने या घटनेकडे पाहिलेले नसल्याने इथल्या चिमुरड्यांच्या जीवावर ही इमारत बेतण्याचा मोठा  धोका आहे.

येथील विद्यार्थ्यांचा बळी गेल्यावरच या समस्येकडे लक्ष जाणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ही इमारत उभारलेली आहे. दगड, वाळू आणि सिमेंटमध्ये बांधलेल्या या इमारतीवर बेंगलोरी कौले बसविली आहेत. एकूण चार खोल्यांपैकी एक खोली सध्या पूर्ण ढासळलेली आहे. पूर्वेकडील एका खोलीवरील बेंगलोरी कौलांचे आच्छादन वाशे व बॅटनसहीत पूर्णपणे जमीनदोस्त  झालेले आहे. भिंतीही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आच्छादन पूर्ण कोसळल्याने बाजूच्या भिंतीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यातील एक भिंत पडल्यास संपूर्ण इमारत जमीनदोस्त होण्याच्या धोका आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मोडकळीस आलेल्या इमारतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतीलगतच दक्षीण बाजूला नवी आरसीसीमधील इमारत उभारली असून त्या इमारतीत शाळा भरते. ही जुनी इमारत आणि नवीन इमारत यांच्यात केवळ पंधरा ते वीस फुटांचे अंतर आहे. विद्यार्थ्यांचा वावर या जुन्या इमारतीलगतच असल्याने कोणत्याही क्षणी जुनी इमारत विद्यार्थ्यांचा अंगावर कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे शासनाने ही जुनी इमारत तातडीने पाडावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत सरपंच स्वाती गायकवाड म्हणाल्या, " मोडकळीस आलेली ही जुनी इमारत पाडण्यासाठी तसेच अन्या कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीला पत्रव्यवहार केलेला आहे. शासन्याच्या परवानगीशिवाय ही इमारत पाडू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी या इमारतीचा धोका वाढलेला आहे. शासनाने तातडीने परवानगी देऊन ही इमारत पाडावी." याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com