होर्डिंगमुळे अपघाताचा धोका

होर्डिंगमुळे अपघाताचा धोका

मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गजबजलेल्या या गावांच्या हद्दीतही होर्डिंग अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 

शहराच्या पूर्व भागातील सोलापूर व सासवड महामार्गावरील पालिका हद्दीलगतच्या गावांच्या हद्दीत विविध ठिकाणी असे अनाधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात पाहवयास मिळत आहेत. सोलापूर महामार्गवरील मांजरी बु्द्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, कुंजीरवाडी, उरूळी कांचन तर सासवड मार्गावर फुरसुंगी, उरूळी देवाची वडकी आदी गावांच्या हद्दीत शेकडोने होर्डिंग ऊभारलेले आहेत. त्यातील अनेक होर्डिंग धोकादायक झालेले आहेत. वादळ-वाऱ्यात मोडतोड झालेले होर्डिंगही तसेच उभे आहेत. अनाधिकृतपणे उभ्या राहिलेल्या या होर्डिंगसाठी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत, पंचायतसमिती, जिल्हापरिषद व महामार्ग विभागानेही त्याकडे दुर्लक्ष करून त्याला बळकटीच दिली आहे. 

सोलापूर महामार्गावरील लक्ष्मीकॉलनी ते कवडीपाट टोलनाका या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत महामार्गाच्या दुतर्फा मोठमोठी होर्डिंग धोकादायकपणे ऊभी आहेत. महादेवनगर मांजरी रस्ता, मुंढवा-मांजरी रस्ता, मांजरी शेवाळवाडी रस्ता, द्राक्ष संशोधन केंद्र ते मांजरी गाव रस्ता आदी चौकात व रस्त्यावर होर्डिंगचा कहरच पाहायला मिळत आहे. टोलनाक्याच्या परिसरात कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतही भव्य आकाराची होर्डिंग उभारलेली आहेत. यातील अनेक होर्डिंगची बांधनी जुनी झालेली असून ती केंव्हाही कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. या कोणत्याही होर्डिंगची वेळोवेळी तपासणी केली जात नाही. 
अनेक स्थानिक नागरिकांनी पैशाच्या मोहापायी होर्डिंग व्यवसायिकांना तर काही मिळकतदारांनी स्वतःच उभारणी केली आहे. या व्यवसायातून दरमहा हजारो रूपये उत्पन्न मिळत असल्याने मार्गाच्या शेजारील व चौकातील मिळकतदारांनी मोठ्या प्रमाणात जागा होर्डिंगसाठी दिलेल्या आहेत.     

"सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार अनाधिकृत होर्डिंगधारकांना नोटीस दिलेल्या होत्या. मात्र, होर्डिंग उतरविण्यात आलेले नाहीत. कदम-वाकवस्ती हद्दीत सहा अनाधिकृत होर्डिंग आहेत. सोमवार पासून तपासणी करून सर्वच होर्डिंगधारकांना नोटीस देणार आहोत.''

- पी. एस. देसाई ग्रामसेवक, कदम-वाक वस्ती

मांजरी बुद्रुक हद्दीतील महामार्गासह इतर चारही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग आहेत. त्यापासून मोठा धोका होण्याची भिती आहे. त्यामुळे या सर्वांना नोटीस देवून हे होर्डिंग काढण्यात येतील.''

-अनिल कुंभारग्रामविकास अधिकारी, मांजरी बुद्रुक

"महामार्ग सार्वजनिक विभागाने कोणत्याही होर्डिंगला परवानगी दिलेली नाही. महामार्गाच्या पंधरा मीटर पर्यंत परवानगी दिली जात नाही. त्यामुळे असे अनाधिकृत होर्डिंग आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.''

- गणेश चवरे, कार्यकारी अभियंता, महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग

धोकादायक होर्डिंग्जची ठिकाणे

सोलापूर महामार्ग : लक्ष्मीकॉलनी समोर, कुमार मिडोज जवळ, शेवाळवाडी फाटा, पीएमपीएल डेपो परिसर, कुदळे कार परिसर, भापकरमळा रोड चौक, कदमवाकवस्ती, कवडीपाट टोलनाका, एमआयटी रोड, लोणीकाळभोर चौक, कुंजीरवाडी, थेऊरफाटा चौक, ऊरूळीकांचन चौक आदी ठिकाणी मोठ्या आकारातील होर्डिंग असून ती कोसळल्यास थेट रस्त्यावर पडून अपघाताचा धोका आहे.

सासवड रस्ता : तुकाईदर्शन चौक, गंगानगर चौक, बस डेपो परिसर, फुरसुंगी-उरूळी टेक्सटाईल्स मार्केट परिसर, उरूळी देवाची फाटा, वडकी फाटा, दहावा मैल, दिवे घाट पायथा आदी ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com