हिंदूंच्या मताप्रमाणे देश चालेल - चंद्रकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

 ‘‘देशात हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या मताप्रमाणे देश चालणार. तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेले नाही, अधिकारीही हिंदू आहेत, त्यांनाही सण आहेत, तेदेखील कुटुंबीयांसोबत देखावे पाहायला येतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करून मंडळांचे समाधान होईल असा तोडगा काढू,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पुणे -  ‘‘देशात हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांच्या मताप्रमाणे देश चालणार. तुम्हाला त्रास द्यायला प्रशासन बसलेले नाही, अधिकारीही हिंदू आहेत, त्यांनाही सण आहेत, तेदेखील कुटुंबीयांसोबत देखावे पाहायला येतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करून मंडळांचे समाधान होईल असा तोडगा काढू,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धेचे बक्षीस वितरण पाटील यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे मंगळवारी झाले. या वेळी भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक हेमंत रासने, ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, अंकुश काकडे, सुवर्णयुग बॅंकेचे अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, नगरसेवक अजय खेडेकर, प्रकाश चव्हाण, माणिकराव चव्हाण उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, गणेशोत्सवात नागरिकांना देखावे व्यवस्थित पाहता यावेत, यासाठी वेळ वाढवून देण्याची आणि विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्य वाजवू देण्याची मागणी आहे. यावर मी प्रशासनाशी बोलून कायदेशीर व व्यावहारिक तोडगा काढेन. मला थोडा वेळ द्या. हे प्रश्न प्रबोधनातून संपणारे आहेत. केवळ गुन्हे दाखल करून काही होत नाही.

महापौर टिळक म्हणाल्या की, गणेशोत्सवात ध्वनिवर्धक वापरासाठी दिवस वाढवून द्यावेत व विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी रात्री १२ नंतरही वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. गिरीश बापट, हेमंत रासने, अण्णा थोरात, अशोक गोडसे, अंकुश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

रासने यांची इच्छा पूर्ण होवो
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाषणात, ‘हेमंत रासने मंडळाचे कार्यकर्ते आहेत. गणपती बाप्पा त्यांचीही इच्छा पूर्ण करेल. शहराध्यक्ष माधुरी मिसाळ याही गणेशभक्तांचे ऐकून घेतील,’ असे सांगताच कार्यकर्त्यानी टाळ्या वाजवून स्वागत केले. दरम्यान, रासने हे कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: According to the Hindus the country will run says chandrakant patil