जुन्नरला आरोपीकडून पोलिसांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

जुन्नर - जुन्नर पोलिस ठाण्यात आरोपींकडून पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्याची घटना घडली आहे. याची वाच्यता होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली असली तरी आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

जुन्नर - जुन्नर पोलिस ठाण्यात आरोपींकडून पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्याची घटना घडली आहे. याची वाच्यता होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली असली तरी आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे अंमलदार सचिन नंदकुमार देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर विजय शिंगाडे (वय २५, रा. वरदरी, ता. मालेगाव, जि. वाशीम), राहुल सुभाष दखणे (वय २७), राजेंद्र निवृत्ती शिंदे (वय २८), सचिन सुभाष दखणे (वय २९) व मंगेश किशोर गंगावणे (वय ३०, सर्व रा. सिन्नर, जि. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

याबाबतची माहिती अशी, शिवनेरीवरील वन कर्मचाऱ्याने शनिवारी (ता. १४) सायंकाळी पोलिसांना फोन करून पायथ्याशी ५ ते ६ जण मद्यपान केलेले तरुण गोंधळ घालत आहेत. पर्यटकांना विनाकारण त्रास देत असल्याचे कळविले. 
देशमुख हे तातडीने पोलिस कर्मचारी सूर्यवंशी व चासकर तसेच दोन होमगार्ड यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे नाव, पत्त्याबाबत चौकशी केली असता, त्यातील एकाने ‘तू कोण मला विचारणारा’, असे म्हणून ठाणे अंमलदाराची कॉलर पकडली.

खुर्चीतून बाजूला ओढून तो धक्काबुक्की व झटापट करू लागला. त्या वेळी पोलिस कर्मचारी सूर्यवंशी त्याला सोडवू लागले असता त्यांच्या पोटात त्याने लाथ मारली. त्यांना शांत बसा, असे सांगितले असता ते मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले. या वेळी त्यांच्यासोबत असलेले दोघे आत आले, त्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी सर्वांचे नाव व पत्ते दिले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: accused beating to police crime