अजित पवारांच्या जवळच्या कार्यकर्त्याकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी 

संतोष शेंडकर
Thursday, 13 August 2020

नाशिक येथील त्यांच्याच असिफ मणियार या जुन्या कामगाराने दोन कोटींची खंडणी मागितली होती. वेळोवेळी वेगवेगळ्या फोनवरून पैसे मागत त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. 

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आर. एन. शिंदे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या मुसक्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपीला काल थेट नाशिक येथे जाऊन जेरबंद केले. आज बारामती न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. असिफ मणियार (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते असून, पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते जिल्ह्यात कोट्यवधी रुपयाची सामाजिक कामे करत आहेत. नेमक्या याच मदतीच्या आकड्यांवर डोळा ठेवून नाशिक येथील त्यांच्याच असिफ मणियार या जुन्या कामगाराने दोन कोटींची खंडणी मागितली होती. वेळोवेळी वेगवेगळ्या फोनवरून पैसे मागत त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. 

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

त्यामुळे शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीगणेश कवीतके, जमादार महेंद्र फणसे, गौतम लोहकरे आदींच्या पथकाने त्याला गाफील ठेवत काल नाशिक येथे ताब्यात घेतले. आज बारामती न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of demanding ransom from Baramati businessman arrested in Nashik