रेडीरेकनरचे दर कमी करण्याचा विचार - महसूलमंत्री

रेडीरेकनरचे दर कमी करण्याचा विचार - महसूलमंत्री

पुणे - ज्या भागात रेडीरेकनरचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहेत, अशा भागातील दर कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली. 

"सकाळ माध्यम समूहा'च्या "अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र ः रिअल इस्टेट पुणे' या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी या कार्यक्रमात "क्रेडाई'चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी केली. त्याबाबत थोरात म्हणाले, ""गेल्या काही वर्षांत बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे, याची राज्य सरकारला जाणीव आहे. दोन वर्षे रेडीरेकनरचे दर वाढविण्यात आले नाहीत. मात्र या परिस्थितीत सर्वांना दिलासा मिळावा यासाठी बाजारातील दरांचा अभ्यास करण्यात येत आहे. ज्या भागात रेडीरेकनरचे दर जास्त आहेत आणि बाजारभाव कमी आहे, अशा ठिकाणी रेडीरेकनरचे दर कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ज्या ठिकाणी बाजारभाव वाढत आहेत, दर चांगले आहेत, त्या ठिकाणी रेडीरेकनरच्या दरात थोडीफार वाढ होऊ शकते.'' रेडीरेकनरच्या दरांचा फटका राज्य सरकारच्या प्रकल्पांनाही बसत असल्याने सरकार दराबाबत गंभीर आहे, असेही त्यांनी स्पष्ट आहे. 

ते म्हणाले, ""गौण खनिज खरेदीसंदर्भात अनेकांना नाहक दंड लावण्यात आल्याचे समजले आहे. या संदर्भात चुकीचे धोरण असेल तर ते दुरुस्त केले जाईल. तसेच ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाईदेखील होईल. याबाबत मुंबईत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. तशी यंत्रणा राज्यातील इतर महानगरपालिकांनी तयार करावी. ऑनलाइन कामकाज झाल्यास व्यावसायिकांचा त्रास कमी होईल. महापालिका स्तरावर हे शक्‍य नसेल तर महसूल विभाग त्याबाबत काम करेल.'' बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

यापुढचा काळ चांगला 
राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना थोरात म्हणाले, ""मी आणि जयंत पाटील अनुक्रमे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहोत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही कोणत्या स्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत याची चर्चा करायचो. भविष्यात काय घडेल हे काहीच माहिती नव्हते. मात्र आता आम्ही दोघेही सत्तेत असून, मंत्री झालो आहोत. मागील पाच वर्ष अवघड गेली असली तरी यापुढचा काळ चांगला असेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com