PuneSafety : पुण्यात सदाशिव पेठेत थरार; ऍसिड हल्ला, गोळीबार 

Fire-Brigade
Fire-Brigade

पुणे : सदाशिव पेठेत घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर एका व्यक्तीने ऍसिड टाकून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. यात तरुणाचा चेहरा भाजला असून, पाठीला गोळी लागली. यानंतर हल्लेखोर नवी पेठेतील एका इमारतीच्या टेरेसवर पळून गेला. त्याच वेळी त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही त्याने गोळीबार केला. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला. तब्बल पावणेतीन तास हे थरारनाट्य सुरू होते. अखेर हल्लेखोर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शहराच्या भर मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबार व ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. 

#PuneSafety रोहित थोरात (वय 25, रा. स्वप्नगंध अपार्टमेंट, टिळक रस्ता) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर सिद्धराम विजय कलशेट्टी (वय 25, रा. अक्कलकोट) असे मृत हल्लेखोराचे नाव आहे. 

रोहित मंगळवारी रात्री नऊ वाजता त्याच्या सोसायटीच्या खाली मैत्रिणीसमवेत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने अचानक त्याच्यावर ऍसिड हल्ला करून गोळीबार केला आणि तो पळून गेला. दरम्यान, सोसायटीतील रहिवासी खाली आले. त्यांनी रोहितला उचलून जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल केले. रोहितला तत्काळ सीटी स्कॅन विभागात नेऊन त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचारांना सुरवात करण्यात आली. रोहितच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्र-मैत्रिणींनी रुग्णालयामध्ये गर्दी केली. 

रोहितवर हल्ला केल्यानंतर कलशेट्टी नवी पेठेतील आनंदी निवास या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आल्याचे पाहून कलशेट्टी बिथरला. त्यातूनच त्याने पोलिस व नागरिकांच्या दिशेने दोन वेळा गोळीबार केला. अखेर त्याने स्वतःच्या डोक्‍यात गोळी झाडली. त्यामुळे तो इमारतीच्या डक्‍टमध्ये पडला. 

दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तेथे जमलेल्या नागरिकांना तेथून दूर राहण्यास सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पहिल्यांदा शिडीच्या साहाय्याने सोसायटीच्या पहिल्या मजल्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कटरच्या साहाय्याने डक्‍टचे ग्रील कापून आत प्रवेश केला. एक तासाच्या प्रयत्नानंतर जवानांना डक्‍टमध्ये हल्लेखोराचा मृतदेह आढळला. जवानांनी मृतदेह जाळीत टाकून इमारतीच्या खाली उतरवून ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. 

प्रत्यक्षदर्शी रोहितची मैत्रीण सांगते... 
रोहित हा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विधी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकतो. तो सुस्वभावी असून त्याचे कोणाशीही कधीही भांडण झालेले नाही. रोहितच्या वडिलांचे निधन झाले असून, तो आईसमवेत राहतो. मी व रोहित सोसायटीखाली बोलत उभे होतो, त्याच वेळी डोक्‍यावर टोपी व पाठीवर सॅक अडविलेली एक व्यक्ती त्याच्या दिशेने आली. त्यानंतर त्याने त्याच्या हातातील ऍसिड रोहितच्या दिशेने फेकले. ते रोहितच्या हनुवटी, छातीवर पडून तो भाजला, असे रोहितच्या प्रत्यक्षदर्शी मैत्रिणीने सांगितले. 

बघ्यांची गर्दी आणि रोखलेले श्‍वास ! 
आनंदी निवास या इमारतीसमोर मोठ्या प्रमाणात पोलिस, अग्निशामक दल, रुग्णवाहिका थांबल्याचे पाहून गर्दी वाढण्यास सुरवात झाली. पोलिसांनी गर्दीला बाजूला करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही अनेक जण मोबाईल हातात घेऊन छायाचित्र काढण्यात, चित्रीकरण करण्यात व्यग्र होते. या घटनेची माहिती व्हॉटस्‌ऍपद्वारे अनेकांपर्यंत क्षणार्धात पोचल्यामुळे बघ्यांची गर्दी जमली. 

हल्ल्याचे कारण गुलदस्तातच 
रोहितवर हल्ला करण्याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र एका व्यक्तिगत प्रकरणात चार महिन्यांपूर्वी कलशेट्टीविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून कलशेट्टीला अटकही झाली होती. या प्रकरणाशी रोहितचा संबंध होता. त्यामुळे हा हल्ला झाला असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com