रस्त्याचे काम बेजबाबदारीने, ठेकेदाराला असा दिला दणका

road
road

दौंड (पुणे) : दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर- दौंड- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार विठ्ठल खामगळ यांनी माहिती दिली की, केंद्र सरकारकडून मनमाड- नगर- दौंड- बारामती- फलटण- बेळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचे कंत्राट घेतलेले असून, अग्रवाल कंपनीस रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सोनवडी (ता. दौंड) येथे भीमा नदी पूल- नगर मोरी- रेल्वे उड्डाण पूल- गजानन सोसायटी- गोकूळ हॉटेल- रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने अतिशय संथ गतीने अतिक्रमणे न काढता काम सुरू आहे.

पावसाळ्यात आणि ऑक्‍टोबरच्या अतिवृष्टीदरम्यान खोदकामामुळे चिखल होऊन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले; तर रस्ता असमान असल्याने चारचाकी आणि अवजड वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात दीपमळा येथे बुधवारी (ता. 13) संध्याकाळी अत्यंत वर्दळीचा डांबरी रस्ता उकरून खोदकाम करण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना परस्पर रस्ता बंद करून अवजड वाहने व यंत्र रस्त्यावरच उभी केली होती. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी किरण राऊत यांनी फिर्याद दिली आहे. बेदरकारपणे लोकांच्या जीवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे व गैरमार्गाने प्रतिबंध केल्याप्रकरणी ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सुरक्षा उपाययोजनाविना काम 
दौंड पोलिसांनी रस्ता खोदकाम, एकेरी वाहतूक करणे, काम करताना वाहतुकीचे नियमन करणे, आदी बाबत ठेकेदारास परवानगी आणि पूर्वसूचना देऊन काम करण्याविषयी वारंवार कळविले होते, परंतु ठेकेदाराने पोलिसांना अजिबात जुमानले नाही. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता लोकांची व वाहनचालकांची अडवणूक करून रस्त्याचे काम सुरू आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com