'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणी जुन्नरला नऊ जणांवर कारवाई

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 29 जून 2018

वाहन चालविण्याचा परवाना नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे आदी कारणावरून सुमारे तीस जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.

जुन्नर - जुन्नर शहर व परिसरात वाहतुकीला शिस्त लागावी,यासाठी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या नऊ जणांवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी दिली.

जुन्नरहून नारायणगाव, ओझर, ओतूर, मढ, आपटाळे, माणिकडोह इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या नाकाबंदीत ही कारवाई करण्यात आली असून वाहन चालविण्याचा परवाना नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे आदी कारणावरून सुमारे तीस जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.

जुन्नर पोलिस ठाण्याच्या पदभार घेतल्यानंतर प्रथम वाहतुकीला शिस्त लावण्याचे धोरण स्वीकारले असून अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास त्याच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मोठया आवाजाचे हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनावर देखील कारवाई केली जाणार आहे.

मोबाईल चोरी, पॉकेटमारी, दुचाकी वाहन चोरी आदी प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेतअसे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Action against nine people in Junnar in Drunk and Drive case