सारसबाग परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहरातील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने हातोडा उगारण्यास सुरवात केली आहे. राजकीय दबाव असूनही सारसबाग परिसरातील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली.

पुणे-  विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहरातील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने हातोडा उगारण्यास सुरवात केली आहे. राजकीय दबाव असूनही सारसबाग परिसरातील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली. दरम्यान, अधिकारी आणि व्यावसायिकांत वाद झाल्याने कारवाईत अडथळा आला; परंतु पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. 

सारसबाग आणि परिसरातील 26 स्टॉलधारकांनी रस्त्यावर उभारलेले छत काढले आहे. ते पुन्हा उभारल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. दरम्यान, सारसबाग येथे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी रस्त्यावरच छत उभारून खुर्च्या आणि टेबल मांडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. यासंदर्भात पुणे पोलिसांनी महापालिकेकडे तक्रार केली; तसेच बेकायदा दुकाने न लावण्यावरून पोलिस व व्यावसायिकांत वादही झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली. बेकायदा स्टॉल, छत आणि अन्य साहित्य ताब्यात घेतले, असे प्रशासनाने सांगितले. 

शहरातील सर्वच भागांतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. सारसबागेतील व्यावसायिकांना छत आणि टेबल, खुर्च्या रस्त्यावर मांडू नयेत, अशी सूचना केली होती; परंतु सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई केली. भविष्यात सारसबागेचा परिसर अतिक्रमणमुक्त असेल याची काळजी घेतली जाईल. राजकीय दबावाला जुमानले जाणार नाही. 
- माधव जगताप, प्रमुख अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on encroachment in Sarasbagh area