महापालिका इमारत गळतीप्रकरणी कारवाई 

अनिल सावळे 
शनिवार, 21 जुलै 2018

नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती यांच्यासमोरच पावसामुळे छतातून पाण्याची गळती झाली होती. अपूर्ण काम असताना पालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाने उद्‌घाटनाचा आततायीपणा केल्याची बाब विरोधकांनी निदर्शनास आणून दिली होती. यासंदर्भात शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश पालिकेला दिले आहेत.

उद्‌घाटनाच्या दिवशी पुण्यात केवळ दोन तासांत 55 मिलिमीटर पाऊस झाला. मुख्य सभागृहाच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या नलिका बंद झाल्यामुळे पाणी साचून छतातून गळती झाली. त्यानंतर नलिका मोकळ्या करण्यात आल्यामुळे गळती थांबली होती. तथापि या इमारतीची संपूर्ण तांत्रिक तपासणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीईओपी) यांच्याकडून करून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. 

आरोग्य विभागप्रमुखपदी सक्षम अधिकारी 
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागप्रमुख पदाचा कार्यभार सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहे. या पदावर सक्षम अधिकाऱ्याच्या नियुक्‍तीसाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच, हे पद प्रतिनियुक्‍तीने भरण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे, असे सभागृहात सांगण्यात आले. 

पीएमआरडीएकडून उमटाचे काम अपेक्षित 
राज्यात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी अर्बन मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ऍथॉरिटी (उमटा) स्थापन करणे आवश्‍यक आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी उमटाची स्थापना करण्यात आली आहे. पुणे महानगर क्षेत्रासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी नागरी वाहतुकीच्या नियोजनासाठी उमटा स्थापन करण्याची अट घालण्यात आली असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हे काम लवकर होणे अपेक्षित आहे, असे बापट यांनी सांगितले. 

आरक्षणाबाबत अहवालानंतर निर्णय 
पुणे शहराची जुन्या हद्दीची सुधारित विकास योजना मंजूर करताना आवश्‍यक सार्वजनिक सेवा सुविधांकरिता पुरेशा प्रमाणात आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. कोथरूड येथील सर्वे क्रमांक 159, 160 आणि 167 पैकी 20 एकर गुंठे क्षेत्र शिवणे गावच्या पूरग्रस्तांसाठी संपादित करण्यात आले आहे. या जागेवर खेळाचे मैदान, अग्निशामक दल आणि प्राथमिक शाळेचा फेरविचार करण्याची विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच, मुंढवा येथील 24 मीटर विकास योजना रस्त्याच्या आखणीत बदल आणि नवीन 12 मीटर विकास योजना रस्ता प्रस्तावित करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी सरकारकडे निवेदन दिले आहे. याचा विचार करून कोथरूड येथील त्या जागेवरील प्रस्तावित आरक्षणे वगळून मुंढवा येथील विकास योजना रस्त्याच्या फेरबदलासाठी तसेच, बाणेर येथील सर्व्हे क्रमांक 35 या जागेवरील आरक्षणाबाबत नागरिकांच्या हरकती सूचना घेण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगण्यात आले. 

पुणे शहरात संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी पालिकेकडून पुरेसे कर्मचारी तसेच कीटकनाशक व औषधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अशा आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पुणे महापालिकेने कळविले आहे, असे सांगण्यात आले. 
 

Web Title: Action on municipal building leakage