छपन्न रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई

छपन्न रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई

पिंपरी - नियमापेक्षा कमी कर भरणे, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता नसणे, कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे यांसारख्या कारणांमुळे जानेवारीपासून ५६ रिक्षा व्यावसायिकांवर मोशी येथील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

या भरारी पथकाने जानेवारीपासून २३७ रिक्षांची तपासणी केली. त्यामध्ये ७९ चालकांकडे व्यवसाय करण्यासाठीच्या कागदपत्रांमध्ये दोष आढळले. पथकाने एकूण ११ रिक्षा ताब्यात घेतल्या. ३१ रिक्षा व्यावसायिकांवर कार्यालयाने कारवाई केली; तर १४ रिक्षा व्यावसायिकांना न्यायालयाने दंड ठोठावला.  

शहर व परिसरात अनेकजण बेकायदा पद्धतीने रिक्षा व्यवसाय करतात. अनेकांकडे बॅज, बिल्लाही नसतो. काही अल्पवयीन मुलेही व्यवसाय करतात. नियमांचे उल्लंघन करून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूकही सुरू असते. मात्र प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करीत नाही, असे नियमाप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. 

या संदर्भात महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले की, शहरात सुमारे दहा हजार रिक्षा व्यावसायिक आहेत. त्यापैकी किमान एक हजार रिक्षाचालक बेकायदा पद्धतीने रिक्षा व्यवसाय करतात. नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कारवाई करण्यास आमचा विरोध असणार नाही. पूर्वी शहराची लोकसंख्या विरळ असल्याने मीटरवर रिक्षा चालविण्यास आमचा विरोध होता. मात्र आता शहराची लोकसंख्या वाढली असल्याने मीटरवर रिक्षा व्यवसाय करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतल्यास त्याला आमचा पाठिंबा राहील.

एका आजारी नातेवाइकाला भेटण्यासाठी चिंचवड येथून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात जायचे होते. त्यासाठी एका रिक्षा व्यावसायिकाने १०० रुपये मागितले. वाढत्या महागाईच्या काळात हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे मीटरप्रमाणे रिक्षा व्यवसाय न करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी.  
-अनिता कांबळे, प्रवासी, चिंचवड

बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा व्यवसायाचा परवाना मिळविल्याचे आढळल्यास तो निलंबित करण्यात येईल. रिक्षा व्यावसायिकांनी मीटरप्रमाणे व्यवसाय करावा. कोणत्याही प्रवाशाने या संदर्भात तक्रार केल्यास संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येईल. 
- आनंद पाटील, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com