नारायणगावला सभापतींच्या गाडीवर कारवाई

नारायणगावला सभापतींच्या गाडीवर कारवाई

नारायणगाव - पुणे-नाशिक महामार्गालगत येथे ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभा करण्यात आलेल्या जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या शासकीय गाडीवर दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या शासकीय वाहनावर कारवाई केल्याने कायदा सर्वांना सारखा असल्याचे पोलिसांनी यातून दाखवून दिले. नारायणगाव पोलिसांच्या या भूमिकेचे प्रवासी व नागरिकांमधून स्वागत होत आहे. 

पुणे-नाशिक महामार्गावर चाकण, खेड, मंचर व नारायणगाव येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त आहेत. कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवली आहे. टीकेचा रोख खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आढळराव पाटील यांच्या पुढाकारातून पुण्यात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. महामार्गालगतची अतिक्रमणे व अवैध वाहतुकीच्या वाहनांमुळे कोंडी होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या बाबत पोलिस काय उपाययोजना करणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला होता. 

या पार्श्‍वभूमीवर नारायणगाव पोलिसांनी तीन दिवसांपासून येथे नाशिक महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. येथे महामार्गालगत ‘नो पार्किंग झोन’ मध्ये उभ्या केलेल्या सुमारे ८० वाहनांवर पोलिसांनी तीन दिवसांत दंडात्मक कारवाई केली. यामुळे कोंडी कमी झाला आहे. जुन्नरच्या शिवसेनेच्या सभापती चव्हाण यांची गाडी आज दुपारी येथील महामार्गालगत ‘नो पार्किंग झोन’ मध्ये उभी होती. नागरिकांनी तक्रार करताच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 

नारायणगावला सभापतींच्या गाडीवर कारवाईया बाबत सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड म्हणाले, ‘‘राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे. दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांशी अरेरावी करत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी या बाबत कार्यकर्त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सूचना देणे आवश्‍यक आहे.’’

माझ्या कामासाठी चालकाला गाडीसह नारायणगावला पाठविले होते. इतर गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असल्याने चालकाने ‘नो पार्किंग झोन’ मध्ये गाडी उभी केली होती.
- ललिता चव्हाण, सभापती, जुन्नर पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com