संशोधन पत्रिकांच्या "बाजारा'ला पुण्यात धक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे : प्राध्यापकांकडून पैसे घेऊन संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) "बाजारा'ला पुण्यातून पहिला धक्का बसला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शिफारशीवरून विद्यापीठ अनुदान आयोगाने चार हजार 102 जर्नलची नावे अधिकृत यादीतून काढून टाकली आहेत. 

पुणे : प्राध्यापकांकडून पैसे घेऊन संशोधन प्रसिद्ध करणाऱ्या धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) "बाजारा'ला पुण्यातून पहिला धक्का बसला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शिफारशीवरून विद्यापीठ अनुदान आयोगाने चार हजार 102 जर्नलची नावे अधिकृत यादीतून काढून टाकली आहेत. 

आंतररराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपत्रिका नेचर आणि करंट सायन्स यांनीही भारतात दर्जाहीन जर्नलचे पेव मोठ्या प्रमाणात असल्याचे निरीक्षण लेखातून मांडले होते. हाच विषय आज लोकसभेत आल्यानंतर केंद्राने आयोगाकडील त्यांची यादी तपासण्याची ग्वाही दिली आहे; परंतु त्यापूर्वी विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांच्या समितीने आयोगाकडील अधिकृत संशोधन पत्रिकांची यादी तपासली होती. त्यातून धंदेवाईक आणि दर्जा नसलेले जर्नल शोधले होते. 

डॉ. पटवर्धन यांनी आयोगाशी संपर्क करून अधिकृत यादीतून त्यांची नावे वगळण्याची शिफारस केली होती. याबाबत "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""विद्यापीठाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चांगल्या जर्नलचे निकष निश्‍चित केले. त्यानंतर आयोगाकडील सहा हजार जर्नलची यादी तपासली असता, चार हजारांहून अधिक जर्नल दर्जाचे कोणतेच निकष पूर्ण करीत नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना वगळण्याची सूचना आम्ही केली. ती आयोगाने स्वीकारून कार्यवाही केली आहे.'' 

प्राध्यापकांच्या दर्जाहीन संशोधन प्रसिद्ध करण्याचे काम या पत्रिकांमार्फत केले जाते. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाचक्की झाली. तसेच संशोधनाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जर्नलची यादी पुन्हा तपासण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे पटवर्धन म्हणाले. 

सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्‍स 
संशोधन प्रसिद्धीसंबंधी नैतिकतेबाबत जागृती आणि त्याचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठात "सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्‍स' हे केंद्र सुरू केले जाणार आहे. चांगल्या आणि निकृष्ट दर्जाच्या जर्नलची यादी या केंद्रामार्फत प्रसिद्ध केली जाईल. रिसर्च पब्लिकेशन एथिक्‍स हा अभ्यासक्रमही तयार करण्याचा विचार आम्ही करीत आहोत, असे पटवर्धन यांनी सांगितले. 

Web Title: action taken against research papers "Market"