
महिलांची छेड काढणाऱ्यांची खैर नाही! छेड काढणाऱ्यांचा रेकॉर्ड तपासून...; आयुक्तांच्या सूचना
पुणे : तुळशीबाग, फर्ग्युसन रस्त्यासह शहरातील गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेड काढणाऱ्याविरुध्द पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ‘महिलांची छेड काढणाऱ्यांची माहिती घ्या. त्यांचे रेकॉर्ड तपासून कारवाई करा’, अशा स्पष्ट सूचना अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
तुळशीबाग आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात बुधवारी (ता. १०) बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रवीणकुमार पाटील यांनी व्यावसायिकांची मते जाणून घेतली. (Latest Marathi News)
तसेच, महिलांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सहायक आयुक्त गजानन टोम्पे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने, तुळशीबाग व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडित, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, छोटे व्यावसायिक असोसिएशनचे पदाधिकारी प्रदीप इंगळे, अमर शहा, अरविंद तांदळे, प्रसाद हंडे आणि पथारी व्यावसायिक उपस्थित होते.
‘‘तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. त्यासाठी छेडछाड विरोधी आणि दामिनी पथक नेमण्यात आले आहे. याशिवाय कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी नियुक्त करावेत. गर्दीतील अपप्रवृत्तींवर निरीक्षण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासोबतच टॉवरही उभारण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कामगारांची माहिती पोलिसांना द्यावी’’, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी दिल्या. ( Breaking Marathi News)
दरम्यान, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आणि स्थानिक व्यावसायिक यांच्यात योग्य समन्वय ठेवून उपाययोजना करण्यात येतील, असे व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तुळशीबाग परिसरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
- महिला छेडछाड विरोधी आणि दामिनी पथकाकडून गस्त
- कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी नेमणार
- गर्दीतील अपप्रवृत्तींवर निरीक्षण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि टॉवर
- व्यावसायिकांना सर्व कामगारांची माहिती देणे आवश्यक
- पोलिस आणि व्यापारी असोसिएशन यांच्यात योग्य समन्वय ठेवणार.