सुटीच्या दिवशीही अतिक्रमणांवर कारवाई होणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

पुणे - वर्दळीच्या रस्त्यांवर सुटीच्या दिवशी म्हणजे, शनिवारी आणि रविवारी बेकायदा दुकाने मांडणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. अशा व्यावसायिकांच्या नावांची यादी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील महिनाभर मोहीम राबवून रोज दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. 

या मोहिमेसाठी त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांसह जादा शंभर कामगार आणि 25 ट्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रभावीपणे कारवाई शक्‍य होईल, अशी आशा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला आहे. 

शहरातील सुमारे 153 चौक आणि 45 रस्त्यांवर हातगाडी, पथारी आणि स्टॉलधारकांना बंदी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत, सर्रास बेकायदा दुकाने मांडण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्येही ही परिस्थिती असून, विशेषत: महात्मा फुले मंडईच्या आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, या भागांमधील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

या संदर्भात तक्रारी केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने या रस्त्यांवर सातत्याने अतिक्रमणे होत आहेत. त्यातच, प्रमुख रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सुटीच्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर आता नियमित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात सुटीच्या दिवशीही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे म्हणाले, ""रस्त्यांवर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत अतिक्रमणे होतात. त्यामुळे दुपारपासूनच ही कारवाई करून अतिक्रमणे काढली जातील. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. सलग महिनाभर रोज कारवाई होईल.'' 

बेकायदा व्यावसायिकांची यादी तयार 
राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने शहरातील अनेक भागांत कायमस्वरूपी दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यावर कारवाई करूनही संबंधित व्यावसायिकांनी धडा घेतलेला नाही. विशेषत: पेठांमधील बाजारपेठांमध्ये ही अतिक्रमणे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा भागातील बेकायदा व्यावसायिकांची यादी तयार असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Action will be taken on encroachment on holidays