Shaira Bano
Shaira Bano

महिलांना न्याय मिळेपर्यंत लढणार : शायरा बानो

पुणे : "मुस्लिम कायद्यात परिवर्तन व्हायला हवे... जे शोषण आणि अत्याचार मी भोगले, ते इतर कुणालाही भोगावे लागू नयेत. मला माझ्या लढ्यात यश मिळेल, ही मला खात्री आहे. मला मदत केलेल्या सर्वांचीच मी आभारी आहे. मला आणि इतरही मुस्लिम महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे... हा आपण स्वतःसाठी देण्याचा लढा आहे,'' तीनवेळा तलाक देण्याच्या मुस्लिम समाजातील परंपरेच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या शायरा बानो यांचा हा एल्गार.

पुरुषी वर्चस्वाने बुरसटलेल्या मानसिकतेत पतीने तलाक दिल्याचे लक्षात आले, तेव्हा डगमगून न जाता या तलाक परंपरेला थेट सर्वोच्च न्यायालयातच आव्हान देणाऱ्या हिमतीच्या महिला शायरा बानो यांचे छोटेसेच पण मनात धाडस जागवणारे आत्मकथनपर व्याख्यान अनेकांना शनिवारी ऐकता आले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत आयोजिलेल्या "मुस्लिम महिला अधिकार राष्ट्रीय परिषदे'च्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने शायरा बानो पुण्यात आल्या होत्या. या वेळी आपल्या मोजक्‍या शब्दांनी त्यांनी अनेकांना अंतर्मुख केले.

बानो यांच्यासह या एक दिवसीय परिषदेला डॉ. नूर जहीर, भाई वैद्य, विद्या बाळ, खातून शेख, प्रा. शमशुद्दीन तांबोळी तसेच विविध राज्यांतील मुस्लिम महिला उपस्थित होत्या.

बानो म्हणाल्या, ""मुस्लिम समाजात हलाला, तोंडी तलाक, ट्रिपल तलाक अशा अनेक बुरसटलेल्या अमानुष प्रथा अस्तित्वात आहेत. या प्रथा स्त्री सन्मानाच्या विरोधात असल्याने तातडीने बंद व्हायला हव्यात. मुस्लिम समाजात कधीपर्यंत या प्रथा राहतील, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. माझ्या पतीचा माझ्याशी असणारा व्यवहार अतिशय अमानुष असाच होता. मी त्याच्या विरोधात माझ्या मानवी हक्कांसाठी एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून उभी राहिले.''

मुस्लिम मागास नाहीत
नूर जहीर म्हणाल्या, ""मुस्लिम म्हणजे फक्त मागासच, अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जात आहे. वास्तव तसे नाही. मुस्लिम समाजातील महिलांची बाजू मांडली जाईल, अशी वेळ कधी येणार, हा प्रश्न आम्हाला पडतो. अगदी नेहरूंनीही हे केले नाही. महिला हक्काची मोहीम फक्त ट्रिपल तलाकवर अवलंबून नाही. महिलांनाही पुरुषांना तलाक देता येण्याचा अधिकार आणि पोटगीचा मुद्दाही यात आवश्‍यक आहे. शायरा यांच्याप्रमाणे प्रत्येकच महिला सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकणार नाही. त्यांच्यामागे आपण उभे राहायला हवे.''

परिषदेतील मागण्या
- तोंडी एकतर्फी तलाक रद्द करा
- न्या. रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारसी लागू करावी
- मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा हवी
- जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालय स्थापन करावे

महिलांनी हाती "हंटर' घ्यावा!
भाई वैद्य म्हणाले, ""महिलांनी आवश्‍यकता भासल्यास हातात "हंटर' घ्यावा. त्याशिवाय त्यांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीत सुधारणा होणार नाही. प्रत्येकच धर्माने महिलांवर अन्याय केला आहे. त्यांना सापत्नभावाची वागणूक दिली आहे. ही परिस्थिती बदलयलाच हवी.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com