उमेदवारांची लगबग; कार्यकर्त्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

अरे ‘एबी फॉर्म’ मिळाला का नाही. आधी अर्ज भरून टाकतो... अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत... इथे अनामत रक्कम कुठे जमा करून घेतात... अर्जावर शिक्का कुठे मारून मिळतो... अरे, स्टेपलर आणला आहे का... अर्ज देतानाचा फोटो काढा बरं का, ‘फेसबुक’साठी... अहो, दादा आधी अर्जावर सही करा... अर्ज भरला खरा; पण ‘एबी फॉर्म’ येईल ना... उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधील असा संवाद सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात कानावर पडत होता.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. सकाळी अकरापासून अर्ज दाखल करता येणार होते; पण सकाळी सात वाजल्यापासूनच सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात इच्छुक उमेदवारांची रांग लागली होती. क्षणाक्षणाला गर्दी वाढत होती. कोणाचे कार्यकर्त्यांसोबत घोषणा देत, तर कोणाचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत, कोणाचे महागड्या वाहनांमधून उतरत, तर कोणाचे रिक्षांमधून आगमन होत होते. कोणी मोदी कुर्ता परिधान केलेला, तर कोणी तर पक्षाच्या रंगाची साडी परिधान केलेली... कोणाकडे पक्षाचा बिल्ला, तर कोणाच्या गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे होते.
प्रत्येकाला रांगेत उभे राहून अर्ज दाखल करावा लागला. त्यामुळे सर्व पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते एका रांगेत पाहायला मिळाले. त्यांच्यात वादावादी होऊ नये, म्हणून कार्यालयाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. उमेदवारांसोबत मोजक्‍याच कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जात असला, तरी अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कार्यालयात चांगलीच गर्दी झाली होती. तितकीच गर्दी कार्यालयाबाहेरील आवारातही होती. ऊन वाढत असल्याने सावलीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे घोळके लाडक्‍या नेत्याची वाट पाहत बसले होते. नेते अर्ज भरून बाहेर येताच हे कार्यकर्ते घोषणा देत होते.

Web Title: activities crowd