पुणे - पूर्व हवेलीमध्ये स्वच्छतेचे तुफान

जनार्दन दांडगे
सोमवार, 30 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामस्थ व तरुणांनी रविवारी (ता. 29) श्रमदानातून गावाजवळून जाणाऱ्या जुन्या मुळा-मुठा कालव्याच्या वितरीकेची साफसफाई केली व गावठाणालगतच्या बंधाऱ्यामध्ये कालव्याचे पाणी आणले.

उरुळी कांचन (पुणे) : गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेवून नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामस्थ व तरुणांनी रविवारी (ता. 29) श्रमदानातून गावाजवळून जाणाऱ्या जुन्या मुळा-मुठा कालव्याच्या वितरीकेची साफसफाई केली व गावठाणालगतच्या बंधाऱ्यामध्ये कालव्याचे पाणी आणले.

ग्रामपंचायतीकडून मागील महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा एकदिवसाआड पुरवठा केला जात होता. पाण्याचे दुर्भिक्ष पाहून सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुणांनी एकत्र येऊन बेबी कालव्याच्या वितरीकेची सफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वांनी रविवारी पुणे-दौंड रेल्वे मार्गापासून ते गावठाण पर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या वितरीकेची व गावठाण लगतच्या बंधाऱ्याची सफाई केली.

दरम्यान सफाईनंतर वितरीकेचे बंधाऱ्यात आलेले पाणी व त्यामुळे आसपासच्या परीसरातील कूपनलिकांची पाणी पातळी वाढणार या आशेने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. या श्रमदानामध्ये गावातील ग्रामपंचायत व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व तरुण मिळून सुमारे दीडशे जणांनी यामध्ये सहभाग घेतला. 

पूर्व हवेलीमध्ये स्वच्छतेचे तुफान - 
पूर्व हवेलीमध्ये उरुळी कांचन, सोरतापवाडी या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नायगाव व शिंदवणे येथील तरुणांनी देखील आपापल्या गावामध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.

उरुळी कांचन येथे अडीच वर्षांपूर्वी विविध क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान ग्रुप सुरु केला. या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी गाव व परिसरात तीन ते चार तासांची स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्याचप्रमाणे मागील वर्षभरापासून सोरतापवाडी (ता. हवेली) येथे सरपंच सुदर्शन चौधरी यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामस्थ व तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने गावामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे.

तसेच मागील तीन आठवड्यापासून नायगाव येथे सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी यांच्या पुढाकाराने गावठाण हद्दीमध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम सुरु आहे. यामध्ये गावातील भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत परिसर स्वच्छता करण्यात आला आहे. तसेच शिंदवणे येथे देखील रविवार (ता. २९) पासून येथील जय मल्हार तरुण मंडळाने स्वच्छता मोहीम सुरु केली आहे.

Web Title: activity of cleaning started in whole east haveli tehsil