कलाकाराने स्वतःला विद्यार्थीच समजावे - उस्ताद मोईनुद्दीन खान

Moinuddin-Khan
Moinuddin-Khan

पुणे - ‘‘कलाकार स्वत:च्या मैफली सोडून अन्य कार्यक्रमांना जाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. कलाकार कितीही मोठा झाला, तरी त्याने स्वत:ला आयुष्यभर विद्यार्थीच समजले पाहिजे. त्यासाठी अन्य कलाकारांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्याकडील चांगले आत्मसात करावे, ही संगीताची पूजा आहे,’’ अशी भावना प्रख्यात सारंगीवादक उस्ताद मोईनुद्दीन खान यांनी व्यक्त केली.

पुण्यात होणाऱ्या वसंतोत्सव संगीत महोत्सवाची सुरवात १८ जानेवारीला मोईनुद्दीन खान आणि त्यांचे पुत्र मोमीन खान यांच्या सारंगी वादनाने होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. खान यांची आठवी पिढी संगीत साधना करीत आहे. संगीताची साधना ही परमेश्‍वराचीच सेवा असून, तो परमेश्‍वराच्या जवळ जाण्याचा हा राजमार्ग असल्याचे ते मानतात.

सध्याची तरुण पिढी खूप आश्‍वासक असल्याचे सांगून ते म्हणाले, की संगीत मैफलींचा कालावधी कमी झाला आहे. तरुण वेगवेगळे प्रयोग करू पाहात आहेत. भारतीय शास्रीय संगीत हे कालौघात विस्तारत जाईल. या संगीतात अनेक प्रवाह मिश्रित होत राहिले, तरी त्याने फारसा फरक पडणार नाही.

मागील हजारो वर्षे शास्रीय संगीत आहे. पुढेही अनेक वर्षे ते मानवी मनावर रुंजी घालत राहील. तरुणाई काही प्रामाणात पाश्‍चात्त्य संगीताकडे वळू लागली असून, फ्युजनवर भर दिला जातोय, याबद्दल मोइनुद्दीन खान म्हणाले, की ‘फ्युजन’ हे मला ‘कन्फ्युजन’ वाटते. तरुण मुलांना ते आकर्षित करीत आहे. यामुळे शास्रीय संगीताची शुद्धता कमी होईल. परंतु, याच तरुणांना पुढे त्या स्वर्गीय अनुभूतीची आस लागेल आणि ते पुन्हा शुद्ध शास्रीय संगीताकडे प्रवाहित होतील. शास्त्रीय संगीत ही ईश्‍वराची सर्वांत चांगली पूजा आहे. शाळांनी अभ्यासाबरोबरही संगीत शिकविले पाहिजे.

संगीताशी जोडला गेला, म्हणजे संताबरोबर जोडला गेल्यासारखे आहे. 
लोकांना संगीत ऐकण्यासाठी वेळ राहिलेला नाही. म्हणून कलाकारांचा रियाज देखील कमी झालेला दिसतो. परंतु संगीताचे भविष्य वाईट नाही. नवी पिढीच त्याला नवी उंची देऊ शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मुलांना शाळेत एबीसीडीबरोबर सारेगमपदेखील शिकवा. यातून त्यांना सुरांची संगत लाभेल. त्याचे मन वाईट विचारांपासून दूर जाईल. भक्ती, सन्मार्गाची ओढ तर लागेलच, याशिवाय त्याला भविष्याची योग्य वाटही सापडेल. 
- उस्ताद मोइनुद्दीन खान, सारंगीवादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com