esakal | पुणे महापालिकेत गावांच्या समावेशाबाबतची सुनावणी व्हावी प्रत्यक्ष; कोळेवाडी ग्रामस्थांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेत गावांच्या समावेशाबाबतची सुनावणी व्हावी प्रत्यक्ष; कोळेवाडी ग्रामस्थांची मागणी

पुणे महापालिकेत गावांच्या समावेशाबाबतची सुनावणी व्हावी प्रत्यक्ष; कोळेवाडी ग्रामस्थांची मागणी

sakal_logo
By
किशोर गरड

दत्तनगर : नव्याने पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधून, साधारण ४९१ हरकती संबंधित ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आल्या आहेत. या हरकतींवर १९ व २० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यापुढे होणारी सुनावणी ही वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे हरकतीधारक ग्रामपंचायती व अर्जदारांना कळविण्यात आले आहे. परंतु, आयुक्तांसमोर होणारी सुनावणी ही प्रत्यक्ष (ऑफलाइन पद्धतीने) व्हावी अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयुक्तांना इमेलद्वारे करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सदरील समाविष्ट होणाऱ्या २३ गावांपैकी बहुसंख्य आदिवासी असलेले कोळेवाडी हे गाव आहे.

जांभूळवाडी-कोळेवाडी ही संघ ग्रामपंचायत (ग्रुप) असून नव्याने महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये याचा समावेश आहे. पैकी कोळेवाडीतुन ५ हरकती अर्ज आयुक्तांकडे सादर झाले आहेत. कोळेवाडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये आहे. गावातील ९५ टक्के नागरीक हे आदिवासी समाजाचे असून त्यांचा उदरभरणाचा व्यवसाय हा मध, करवंदं, बेलफुलं, दुर्वा, दुध विकणे हा आहे. गाव जर महापालिकेत समाविष्ट झाले तर ग्रामस्थांचा हा व्यवसाय लुप्त पावेल ही समस्या ग्रामस्थांना भेडसावते आहे. गावात अजूनही घरात वीज न घेता आलेली कुटुंब आहेत. जे ग्रामपंचातींचा कर भरू शकत नाहीत ते महापालिकेचा कर कसा भरू शकतील? असाही सवाल कोळेवाडीतील ग्रामस्थ उपस्थितीत करत आहेत.

हेही वाचा: पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

शिक्षणाचा अभाव असलेल्या कोळेवाडीतील बहुतांश तरुण हे रोजंदारीवर, शेतात काम करणारे आहेत. शिवाय गावाला अजूनही गावठाण नाही. अगोदरच भूमिहीन केलेल्यांना प्रशासनाने बेघर करू नये असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. आयुक्तांसमोर आम्हाला आमच्या गावचे प्रश्न प्रत्यक्ष मांडायचे असून त्यांनी आमच्या गावाला भेट देऊन काय तो निर्णय घ्यावा. शिवाय कोळेवाडीचा समावेश महापालिकेत न करता गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत करावी.अशी मागणी रहिवाशी करणार असल्याचे सांगितले. परंतु ऑनलाइन सुनावणीमध्ये आम्हाला आमच्या व्यथा मांडण्यासाठी वेळेचे बंधन असेल. शिवाय इंटरनेटद्वारे संवाद साधत असताना नेटवर्क ची समस्या येण्याचीही भीती असते. प्रत्यक्ष संवादाशिवाय आमचे म्हणणे प्रभावीपणे पोहचणार नाही असे ग्रामस्थ सांगत आहेत.त्यामुळे होणारी सुनावणी ही प्रत्यक्ष (ऑफलाईन )व्हावी अशी मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

  • गावातील लोकसंख्या : ९५०

  • मतदार : ४५० ते ५००

  • हरकती दाखल अर्ज संख्या : ५