सिग्नलच सोडविणार कोंडी

सुधीर साबळे  
बुधवार, 6 जून 2018

पिंपरी - शहरात ९५ वाहतूक सिग्नलवर नव्याने बसविण्यात येणाऱ्या ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे (एटीएमएस) वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. यामध्ये सिग्नलचे नियंत्रण सेन्सरच्या आधारे करण्यात येणार असून, वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये ही यंत्रणा सुरू होईल. 

पिंपरी - शहरात ९५ वाहतूक सिग्नलवर नव्याने बसविण्यात येणाऱ्या ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे (एटीएमएस) वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे. यामध्ये सिग्नलचे नियंत्रण सेन्सरच्या आधारे करण्यात येणार असून, वाहनांच्या गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये ही यंत्रणा सुरू होईल. 

सध्या शहरातील कोणत्याही सिग्नलचे सिंक्रोनायझेन करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरळ मार्गावर असणाऱ्या सिग्नलच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होतात. एटीएमएसमुळे हे पूर्णपणे थांबणार आहे. एटीएमएसमध्ये सिग्नलला वाहने थांबण्याची वेळ गरजेनुसार कमी जास्त होईल. एखाद्या सिग्नलला वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग असेल तर त्याठिकाणी वाहनांना जाण्यासाठी अधिक वेळ दिला जाईल. जिथे वाहनांची गर्दी कमी असेल तिथे वेळ कमी राहील. सिग्नलच्या चौकातून वाहने जात असताना त्यांना पुढील चौकात वाहतुकीची स्थिती काय आहे, याची माहिती अगोदरच्या चौकामध्येच मिळणार आहे. पुढील चौकामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला किती वाहतूक आहे, याचा अंदाज त्यांना अगोदरच्या चौकातच येणार आहे. पोलिसांना रस्त्यावरून धावणाऱ्या एखाद्या वाहनाचा शोध घ्यायचा असल्यास तेदेखील सेन्सरमुळे शक्‍य होणार आहे. यासाठी वाहनांच्या नंबरप्लेट युनिफॉर्म पद्धतीच्या असणे आवश्‍यक आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास लागणे सहज शक्‍य होणार आहे.

ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमबाबत गेल्या महिन्यात महापालिकेत बैठक झाली होती. वाहतूक पोलिसांनी यासाठी आवश्‍यक ती सर्व माहिती पालिका प्रशासनाला दिलेली आहे. यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. 

- अशोक मोराळे, उपआयुक्‍त, वाहतूक पोलिस
 

एटीएमएससाठीची निविदा प्रक्रिया महापालिकेने सुरू केलेली आहे. निविदा उघडण्यापूर्वीची सभा येत्या शुक्रवारी (ता. ८) घेण्यात येणार आहे. त्यामध्ये या यंत्रणेत कोणते बदल अपेक्षित आहेत का, यावर चर्चा करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांना यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. 
- निळकंठ पोमण,  मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका

एटीएमएसचे फायदे
    एटीएमएस यंत्रणा सर्व सिग्नलमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीच्या नियोजनामध्ये सुसूत्रता येणार 
    कोंडी झाल्यानंतर ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर येणारा ताण कमी होण्यास मदत 
    अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत

Web Title: Adaptive Traffic Management System in PCMC signal